सावंतवाडी ः साटेली गावात सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्प विरोधात स्थानिक डंपर चालक- मालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. हा प्रकल्प तातडीने थांबविण्यात यावा या मागणीसाठी खाणीवर जाणार्या मुख्य रस्त्यावर हे बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. सुमारे 30 हून स्थानिक डंपर चालक मायनिंग प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पावर स्थानिक डंपर चालकांना वगळून बाहेरील डंपर्सना रोजगार दिला जात आहे. त्या विरोधात हे आंदोलन आहे.
जोपर्यंत आम्हांला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी कंपनीला दिला आहे. याबाबत आपली भूमिका मांडताना आंदोलनकर्ते डंपर चालक-मालक म्हणाले, पंचक्रोशीत अनेक मायनिंग प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी संबधित कंपन्यांकडून खनिज उत्खनन सुरू आहे. हे खनिज वाहतुकीसाठी प्रकल्प व्यवस्थापन स्थानिकांच्या डंपर्सना प्राधान्य देण्या ऐवजी परराज्यातील डंपर्स व्यावसायिकांना काम देत आहे. यामुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली असून हा आमच्यावर अन्याय असल्याचे या डंपर्स चालक-मालकांचे म्हणणे आहे.
मायनिंग कंपनीला स्थानिकांना रोजगार देता येत नसेल, मूलभूत गरजा पुरवता येत नसतील तर कंपनीचा गावासाठी उपयोग काय? असा सवाल या आंदोलकांचा आहे. गावातील मुख्य मायनिंगचा स्त्रोत कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी नेत असेल आणि त्याचा गावाला प्रदूषणापलीकडे कोणताही फायदा होत नसेल, रोजगार उपलब्ध होत नसेल तर उपयोग काय? असा सवाल करीत याबाबत प्रशासनाने योग्य ती भूमिका घ्यावी, अन्यथा आमचे आंदोलन सुरू राहणार, असलेयाचे येथील डंपर व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते नितीन कळंगूटकर यांनी सांगितले.