दोडामार्ग : मोर्ले गावात ज्ञानेश्वर चिरमुरे यांच्या घरातील पडवीत बिबट्याने घुसून कुत्राच्या सात पिल्लांना भक्ष्य केले. ही घटना मंगळवारी पहाटे ४ वा. दरम्यान घडली. बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे सध्या गावात भीतीचे वातावरण आहे. याबाबत महेश चिरमुरे यांनी दोडामार्ग वनक्षेत्रपाल संभाजी पाटील यांना निवेदन देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करावी, अशी मागणी केली.
मोर्ले गावात ज्ञानेश्वर चिरमुरे यांचे भर लोक वस्तीत घर आहे. त्यांच्या घराच्पा यडवीत कुत्र्याची सात पिल्ले आपल्या आई सोबत झोपली होती. पहाटे बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी पिल्लाच्या आईने भीतीने तेथून पळ काढला. या नंतर बिबट्याने सात ही पिल्लांचा जागेवरच फडशा पाडला. सकाळी म्हशीचे दूध काढण्यासाठी उठलेले ज्ञानेश्वर चिरमुरे यांनी पडवीत रक्त व मांसाचा सडा दिसून आला. तसेच पडवीत व अंगाणात बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसून आले. यावरून बिबट्यांनेच या पिल्लांना भक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले. या घटने मुळे चिरमुरे कुटुंब भयभीत झाले आहे. त्यांच्या घराच्या बाजूलाच म्हशीचा गोठा असून या बिबट्यामुळे त्यांच्या पाळीव जनावरांनाही धोका निर्माण झाला आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी श्री. चिरमुरे यांनी वन विभागाकडे केली आहे. वनक्षेत्रपाल श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.