वेंगुर्ला : दाभोली-कोऱ्याचीवाडी येथे बुधवारी सकाळी एक जखमी बिबट्या थेट बागायतदाराच्या स्वयंपाकघरात शिरल्याने मोठी खळबळ उडाली. मात्र, बिबट्या अत्यंत अशक्त असल्याने त्याने सुदैवाने कोणावरही हल्ला केला नाही. वन विभागाने तत्परता दाखवत कुडाळच्या जलद बचाव पथकाच्या मदतीने या बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत.
दाभोली-कोऱ्याचीवाडी येथील बागायतदार विवेक जोशी यांना बुधवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बागेत आणि नंतर गुरांच्या गोठ्यात हा बिबट्या बसलेला दिसला. ग्रामस्थांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न करताच तो थेट जोशी यांच्या स्वयंपाकघरात घुसला. तो जखमी व घाबरलेला असल्याने तिथेच एका जागी बसून राहिला. जोशी कुटुंबीयांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. सहायक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, वनपाल सावळा कांबळे आणि कुडाळच्या बचाव पथकाने (दिवाकर बांबर्डेकर व टीम) अत्यंत शिताफीने स्वयंपाकघरात घुसून बिबट्याला जेरबंद केले.