Zharap Gram Panchayat Sarpanch No Confidence Motion Pudhari
सिंधुदुर्ग

Kudal News | झाराप सरपंच दक्षता मेस्त्रीवर 'अविश्वास'; ठराव ८ विरुद्ध २ मताने मंजूर

​Sarpanch No Confidence Motion | तीन चतुर्थांश बहुमताचे 'मॅजिक फिगर' पूर्ण; अंतिम निर्णयासाठी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे - तहसिलदार पाटील

पुढारी वृत्तसेवा

Zharap Gram Panchayat Sarpanch No Confidence Motion

​कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून राजकीय धुसफूस सुरू असलेल्या झाराप (ता. कुडाळ) ग्रामपंचायतीच्या सत्तासंघर्षाचा अखेर शुक्रवारी (दि.१०) स्फोट झाला. विद्यमान सरपंच दक्षता दशरथ मेस्त्री यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव ८ विरुद्ध 2 अशा प्रचंड बहुमताने मंजूर झाला. कायदेशीर निकषानुसार आवश्यक असलेले तीन चतुर्थांश (३/४) बहुमत विरोधकांनी सिद्ध केल्याने मेस्त्री यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

कायदेशीर गणिताने मेस्त्रींची सत्ता उलथवली

झाराप ग्रामपंचायतीमध्ये अविश्वास ठराव यशस्वी करण्यासाठी ८ सदस्यांच्या पाठबळाची आवश्यकता होती. शुक्रवारी तहसीलदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत हे राजकीय गणित पूर्ण झाले. सरपंचांच्या विरोधात उपसरपंच मंगेश गावकर, अश्फाक कुडाळकर, विजय हरमलकर, प्रियांका रेडकर, तनया मांजरेकर, संजीवनी पेंडुरकर, विशाखा गोडे यांच्यासह अन्य एका सदस्याने मतदान केले. तर सरपंचांच्या बाजूने केवळ अनंत मयेकर हे एकमेव सदस्य उभे राहिल्याने मेस्त्री यांचा 'गड' कोसळला.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३५ अन्वये हा ठराव दाखल करण्यात आला होता. या प्रक्रियेत सदस्यांनी सरपंचांवर गंभीर आरोपांची सरबत्ती केली: यामध्ये ​ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी निर्णय घेणे, जी.एम. पोर्टलद्वारे खरेदी करताना इतर सदस्यांना अंधारात ठेवणे, मंजूर ठरावांची अंमलबजावणी न करणे आणि स्वाक्षरीसाठी टाळाटाळ करणे, ग्रामसेवकांविरुद्ध विनाकारण तक्रारी करून कामकाजात अडथळे निर्माण करणे.​विशेष म्हणजे, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी महिला असल्याचा आधार घेत दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचाही ठपका विरोधकांनी ठेवला होता.

अंतिम निर्णयासाठी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे- पाटील

झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेले तीन चतुर्थांश (३/४) मतदान पूर्ण झाले आहे. ८ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने कौल दिला आहे. या सभेचा सविस्तर अहवाल आता अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून दिला जाणार असल्याची माहिती अविश्वास ठरावाच्या प्रक्रियेनंतर माहिती देताना कुडाळचे तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT