कुडाळ तालुक्यात गडगडाटासह अवकाळी पाऊस  
सिंधुदुर्ग

Kudal Rain : कुडाळ तालुक्यात गडगडाटासह अवकाळी पाऊस

नागरिकांची त्रेधातिरपीट : आंबा, काजू पिके धोक्यात

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वीज गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि लखलखाट व गडगडाटासह शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस बरसला. या पावसाने फिरत्या विक्रेत्यांसह दुचाकीस्वार तसेच नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. गरमी होत असताना पावसाच्या हजेरीने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला, तर रस्तेही ओले चिंब झाले. मात्र या अवकाळी पावसाने ऐन हंगामात आंबा, काजू, कोकमसह हंगामी पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या पावसामुळे शेतकरी बागायतदार चिंतेत सापडले आहेत.

मे महिन्यात ऐन उन्हाळ्यात प्रचंड गरमीत वाढ झाली असतानाच गुरूवारी दुपारपासून वातावरणात अचानक बदल निर्माण झाला. सायंकाळी ४ वा.पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही वेळातच सोसाट्याचा वारा आणि विजांचा गडगडाट व लखलखाट सुरू झाला. त्यानंतर ४.४५ वा.पासून शहर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यापूर्वी ग्रामीण भागात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस बरसला. अचानक कोसळलेल्या पावसाने पादचारी नागरिक, दुचाकीस्वार तसेच फिरत्या विक्रेत्यांची त्रेधातिरपीट उडाली.

ग्रामीण भागात पावसाळी बेगमी, सुकी लाकडे, गवत, गोवऱ्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. ऐन लग्न सराईत पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील धार्मिक कार्यक्रम तसेच लग्न समारंभ कार्यक्रमात काहीसा हिरमोड झाला. एप्रिल महिन्यातही अवकाळी पाऊस कोसळला होता. त्यानंतर आता परत मे महिन्यात पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने कोकणातील हंगामी पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या आंबा, काजू पिकांचे उत्पादन अंतिम टप्प्यात असून, आधीच नैसर्गिक संकटात सापडलेल्या या पिकांना आता अवकाळीचा फटका बसण्याची भीती आहे. ऐन हंगामात कोकणातील हंगामी पिकांसह कोकणी मेवा धोक्यात आला असून, शेतकरी बागायतदार धास्तावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT