प्रमोद म्हाडगुत
कुडाळ : रुग्ण वाढत आहेत... सुविधा वाढत आहेत... यंत्रसामग्रीही येत आहे; मात्र ज्या तज्ज्ञ डॉक्टरांमुळे या सुविधांना खऱ्या अर्थाने उपयोगिता येणार आहे, त्यांचीच कमतरता कायम आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयाची सध्याची अवस्था नेमकी याच विरोधाभासाची आहे. दररोज सुमारे दीडशे रुग्णांची ओपीडी, महिन्याला १५० ते २०० दाखल रुग्ण आणि अपघातग्रस्तांची संख्या यामुळे रुग्णालयावरचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, ३० बेडच्या या रुग्णालयाला अद्याप आवश्यक स्पेशालिस्ट डॉक्टरांची प्रतीक्षा कायम आहे.
चार दशकांपूर्वीच्या इमारतीत सुरू असलेले हे रुग्णालय एकेकाळी ‘प्राथमिक उपचार करा आणि रुग्णाला ओरोस, बांबोळी- गोवा किंवा कोल्हापूरला रेफर करा’ या पद्धतीनेच अधिक ओळखले जात होते. आता परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रसामुग्री आणि सुविधांच्या जोरावर शक्य तितके रुग्ण कुडाळमध्येच उपचार घेतील, यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता हा या प्रयत्नांच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर ठरत आहे. कुडाळ शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे स्थानक, चिपी विमानतळ आणि किनारपट्टीशी असलेली जवळीक यामुळे शहरात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्याचा थेट परिणाम ग्रामीण रुग्णालयावर झाला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी हे रुग्णालय आधारवड ठरत असताना त्याच रुग्णालयाची क्षमता मात्र अद्याप ३० बेडपुरतीच आहे. ती ५० बेडपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे; मात्र मंत्रालय स्तरावर तो अद्याप प्रलंबित आहे.
३० नियमित कर्मचारी; वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे रिक्त
रुग्णालयात सध्या ३० नियमित आणि आठ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाळके यांच्यावर रुग्णालयाची धुरा आहे. मात्र, वर्ग दोनच्या तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ नाही, बालरोग तज्ज्ञ नाही, भूलतज्ज्ञ नाही आणि फिजिशियन व ऑर्थोपेडिक तज्ज्ञांचीही आवश्यकता आहे. त्यामुळे गंभीर अथवा विशेष उपचारांची गरज भासल्यास रुग्णालयाची उपचारक्षमता मर्यादित होते. रिक्त पदांची तात्पुरती भरपाई करण्यासाठी ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर तीन एमबीबीएस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज सुरू असले तरी कंत्राटी मनुष्यबळाच्या जोरावर वाढत्या रुग्णसंख्येचा भार किती काळ पेलणार? हा प्रश्न कायम आहे.
दोन सोनोग्राफी मशीन; पण ‘तज्ज्ञ’ नसल्याने उपयोग शून्य!
रुग्णालयात सोनोग्राफीच्या दोन मशीन उपलब्ध आहेत. मात्र, रेडिओलॉजिस्ट नसल्याने या मशिनचा नियमित वापर होत नाही. म्हणजे मशिन आहे; पण ती चालविणारा तज्ज्ञ नाही. रुग्णालयात यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली, पण ती प्रत्यक्ष रुग्णसेवेत आणण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने सुविधेचा अपेक्षित लाभ रुग्णांना मिळत नाही. ऑपरेशन थिएटरही सज्ज आहे. मात्र, भूल देण्यासाठी आवश्यक मशिन बंद असल्याने त्याच्या नियमित वापरावर मर्यादा आहेत. प्रसूतीसाठी स्वतंत्र कक्ष असूनही अवघ्या ८०० मीटर अंतरावर महिला रुग्णालय सुरू झाल्यानंतर गेल्या साडेतीन वर्षांत येथे एकही प्रसूती झालेली नाही.
१०८ रुग्णवाहिका आहे; डॉक्टर मात्र एक!
संपूर्ण कुडाळ तालुक्यासाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध आहे. मात्र, या रुग्णवाहिकेवर सध्या एकच डॉक्टर कार्यरत आहे. २४ तास सेवा सुरळीत ठेवण्यासाठी चार डॉक्टरांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध असूनही डॉक्टर उपलब्ध नसण्याची वेळ काहीवेळा येते.
आपत्कालीन सेवेतील ही मनुष्यबळाची कमतरता गंभीर बाब ठरू शकते. शवविच्छेदनासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, शासनाने कटरचे पद रद्द केल्याने उपलब्ध सुविधेच्या वापरात अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासनाने तात्पुरती पर्यायी मनुष्यबळाची व्यवस्था केली असली, तरी इमारत उभी राहते; सुविधा उभी राहते; पण मनुष्यबळाच्या अभावामुळे त्याचा वापर अडखळतो, अशी स्थिती आहे.
कुडाळ ग्रामीण रुग्णालयात सध्या दररोज ओपीडीमध्ये सुमारे दीडशे रुग्ण येतात, तर महिन्याला १५० ते २०० रुग्ण दाखल होतात. उपलब्ध मनुष्यबळ आणि सुविधांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उपचार करण्याचा प्रयत्न आहे. प्रयोगशाळेची सुविधा असल्याने तपासण्यांचे अहवालही तत्काळ मिळतात. मात्र, फिजिशियन आणि ऑर्थोपेडिकसह आवश्यक स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध झाल्यास रुग्णांना याच ठिकाणी अधिक चांगली सेवा देता येईल.- डॉ. संजय वाळके, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कुडाळ