कुडाळ : कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई समोरील सुलभ शौचालय नजीकच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी ६.४५ वा.च्या सुमारास अचानक आग लागली. यात गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत गॅरेज मधील साहित्य जळून सुमारे ३० हजारांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. घटनेची माहीती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासह नगरसेवक व नगरपंचायत प्रशासनाने घटनास्थळी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. नगरपंचायतीच्या अग्नीशमन दलाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली.
शहरातील राजश्री काॅम्प्लेक्स रस्त्यालगत संजय सोमा सावंत यांचे छोटेखानी दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. सोमवार असल्याने गॅरेज बंद होत सायंकाळी या गॅरेजला अचानक आग लागली. क्षणार्धात आग भडकली आणि गॅरेज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, नगरसेवक विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, व्यापारी संघटना माजी तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांच्यासह नागरिक तसेच नगरपंचायत प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. नगरपंचायतीच्या अग्नीशमन बंबाला घटनास्थळी पाचारण करून, बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत ऑईलचे चार बाॅक्स, पाच डझन लायनर, बेअरीग दहा डझन, केबल व अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.