कुडाळमध्ये सिमेंट मिक्सर ट्रक उलटला; चालकाचा जागीच मृत्यू 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : कुडाळमध्ये सिमेंट मिक्सर ट्रक उलटला; चालकाचा जागीच मृत्यू

कुडाळ एमआयडीसी येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील महानंद पशुखाद्य कारखाना समोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सरला गुरुवारी सायं. ४ वा. अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मिक्सर ट्रक रस्त्यालगत पलटी झाल्याने केबिनचा चालकाच्या बाजूने चेंदामेंदा झाला. त्यामुळे चालकाला केबीनबाहेर घेताना अडचण आली. जवळपास पाऊण तासानंतर पोलिस व अग्निशमन दलाच्या मदतीने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. धीरू शोभनाथ यादव (वय २४, सध्या रा. कुडाळ, मूळ रा. गोरहाई, सतना, मध्य प्रदेश) असे मयत चालकाचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी दिली.

एमआयडीसीतील प्लांटमध्ये सिमेंट काँक्रीट भरून मिक्सर ट्रक कुडाळ शहरात येत होता. महानंद पशुखाद्य कारखान्यासमोरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिक्सर ट्रक रस्त्यालगत उलटला. या दुर्घटनेत चालक केबिनमध्ये अडकून पडला. अपघातात गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांसह एमआयडीसीच्या अग्निशमन प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने मिस्कर ट्रक उभा करण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या सदस्यांनी पाऊण तासानंतर केबिनमध्ये अडकलेला चालकाचा मृतदेह बाहेर काढला.

या अपघातात तेथील वीज वाहिन्या तुटल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक विकास बडवे आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली. चालकाचा मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT