हरिश्चंद्र पवार
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय मातीचा एक गुणधर्म आहे, येथील जनता जितकी सोशीक आहे, तितकीच ती स्वाभिमानी सुद्धा आहे. प्रस्थापित राजकीय शक्तींनी जेव्हा जेव्हा सामान्य कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा या मातीने क्रांती घडवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कोलगाव मतदारसंघाचा निकाल हा केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर तो प्रस्थापित राजकीय समीकरणांना बसलेला एक जबरदस्त धक्का आहे.
नारळाच्या जोरावर प्रस्थापितांना धक्का
कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाचे अधिकृत चिन्ह वा पाठिंबा नसताना, सत्तेची रसद आणि दिग्गज नेत्यांची फौज समोर उभी असताना, केवळ ‘नारळ’ या चिन्हाच्या जोरावर मायकल डिसोजा यांनी मिळवलेला विजय राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय आहे. सन 2017 मध्ये केवळ 57 मतांची मिळवलेली आघाडी 2026 मध्ये अपक्ष म्हणून लढताना 336 मतांवर नेणे, हे मायकल यांनी कोलगावच्या प्रत्येक घरात निर्माण केलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार आणि जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला सलग दुसऱ्यांदा पराभवाची धूळ चारली आहे.
संघर्ष आणि निष्ठेचा अनोखा संगम
मायकल डिसोजा यांचा हा विजय अचानक आलेला नाही. भाजपमध्ये एकनिष्ठ राहूनही स्थानिक गटबाजीमुळे त्यांच्यावर सहा वर्षांच्या हकालपट्टीची कारवाई झाली. मात्र,‘पक्षातून बाहेर काढता येते, पण जनतेच्या हृदयातून नाही, हे त्यांनी सिद्ध केले. विशेष म्हणजे, विजयानंतरही त्यांनी आपली राजकीय प्रगल्भता जपली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आपले दैवत मानून त्यांचे फोटो विजयाच्या मिरवणुकीत झळकवत त्यांनी आपली निष्ठा अधोरेखित केली. त्यांची लढाई पक्षाशी नसून स्थानिक व्यवस्थेशी होती, हेच त्यांनी यातून दाखवून दिली. या विजयाचा पाया मायकल यांचे वडील फ्रान्सिस डिसोजा यांनी रचला होता. तोच समाजकारणाचा वारसा मायकल यांनी पुढे नेला. विशेषतः कोविड-19 च्या काळात जेव्हा सर्वजण घरात होते, तेव्हा मायकल डिसोजा रस्त्यावर उतरून रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि रेशन मिळवून देत होते. जनतेने त्या कठीण काळात मिळालेल्या मदतीची परतफेड आज मतपेटीतून केली आहे.
विकासाचे व्हिजन 2.0
केवळ विजय साजरा न करता मायकल यांनी कोलगावच्या विकासाचा आराखडाही मांडला आहे. तरुणांसाठी गावातच फूड प्रोसेसिंग युनिट उभारून आंबा-काजूवर प्रक्रिया करण्याचा संकल्प शिवाय नागरी सुविधांमध्ये कारिवडे कचरा प्रकल्पाचा प्रश्न सोडवणे आणि आधुनिक आरोग्य सुविधांचे जाळे विणणे. आदर्श गाव संकल्पना रस्ते, पाणी,विजेच्या पलीकडे जाऊन कोलगावला जिल्ह्यासाठी रोल मॉडेल बनवण्याचे स्वप्न. कोलगावचा हा नारळ जिल्ह्याच्या राजकारणात भविष्यात कोणती नवी वळणे घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.