सावंतवाडी ः कोलगाव- कुणकेरी गावांसाठी जोपर्यंत पाण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पाण्याच्या पाईपलाईनचे काम कोलगावच्या हद्दीत करू देणार नाही, असा इशारा कोलगाव गटाचे जि. प. सदस्य मायकल डिसोजा यांनी दिला. कोलगाव ग्रामस्थांची बैठक श्री. डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत त्यांनी हा इशारा दिला.
श्री. डिसोजा म्हणाले, पाळणेकोंड धरण हे कोलगाव हद्दीत असून धरणासाठी जमीन ही कोलगाव गावातील गेलेली आह. तसेच शुद्धीकरण केंद्र हे कुणकेरी गावात आहे. त्या धरणासाठी कोलगावातील अनेक लोक व एक संपूर्ण वाडी विस्थापित झाली. शेकडो एकर जमीन कोलगावातील व कुणकेरी या गावातील गेली परंतु या धरणाचा फायदा किंचितही कोलगाव व कुणकेरीवासीयांना झालेला नाही. कोलगाव व कुणकेरी या गावातील लोक आजही पाण्यापासून वंचित आहेत.
आ. दीपक केसरकरांकडून भूलथापा व खोटी आश्वासने
आम्ही गेली कित्येक वर्षे सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सहकार्य केले, परंतु आ.दीपक केसरकर यांनी आम्हांला भूलथापा व खोटी आश्वासने देऊन आमच्या तोंडचे पाणी हिरावून घेतले. कोलगाव ग्रामपंचायत बरोबर दिशाभूल करणारे एग्रीमेंट करून आम्हांला पाणी देण्याचे आश्वासन देऊनसुद्धा आम्हांला पाणी देण्यात आले नाही, त्यामुळे आता पाईपलाईनसाठी जी नवीन लाईन टाकण्यात येत आहे. ती कोलगावातून जात आहे. मात्र जोपर्यंत आमची पाण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत या पाईपलाईनचे काम करू देणार नाही, असा एकमुखी ठराव या बैठकीत मायकल डिसोजा यांच्या नेतृत्वाखाली कोलगाव गावातील सर्व ज्येष्ठ व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी भले ही आंदोलन करावे लागले तरी आपण करू, असा इशारा देण्यात आला.