देवगड : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. देवगड समुद्रात रविवारी मध्यरात्री बेकायदा ट्रॉलिंग करणाऱ्या कर्नाटकातील मलपी येथील ‘श्री अनघा’ ही हायस्पीड ट्रॉलर मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने पकडून जप्त केली. गस्ती नौका पाहून पळ काढणाऱ्या या ट्रॉलरचा पथकाने सुमारे तासभर थरारक पाठलाग करत तिला ताब्यात घेतले. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते.
२२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाचे गस्ती पथक ‘शीतल’ या गस्ती नौकेद्वारे देवगड समुद्रात गस्त घालत होते. यावेळी पथकाला सुमारे ५ ते ६ नॉटिकल मैल अंतरावर एक ट्रॉलर वैध परवान्याशिवाय ट्रॉलिंग मासेमारी करताना आढळली. गस्ती नौका पाहून या अंधारात पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने प्रसंगावधान राखत तांत्रिक कौशल्याच्या जोरावर पाठलाग सुरू ठेवला. अखेर सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर ही ट्रॉलर ताब्यात घेण्यात आली.
देवगडचे मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत किरण वाघमारे यांच्यासह सागरी सुरक्षा रक्षक संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर, योगेश फाटक, अमित बांधकर आणि स्वप्निल सावजी यांनी सहभाग घेतला.