कणकवली-मौदे एसटी बस कोसळली खोल दरीत 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : कणकवली-मौदे एसटी बस कोसळली खोल दरीत

चालक-वाहकांसह १२ प्रवासी जखमी

पुढारी वृत्तसेवा

वैभववाडी : कणकवली आगाराची कणकवली-मौदे एसटी बस अरुणा धरणानजीक भोम गवळवाडी हद्दीत सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला. बस दरीत कोसळताना सुदैवाने एका झाडाला अडकली. अन्यथा धरणाच्या जलाशयात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात चालक, वाहकांसह बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

कणकवली-मौदे ही वस्तीची बस घेऊन चालक युवराज पाटील जात होते. बसमध्ये १२ प्रवासी होते. अरुणा धरणाच्या रिंग रोडवरील एका अवघड वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस थेट रस्त्याच्या कडेला खोल दरीत कोसळली. विशेष म्हणजे बस दरीत कोसळताना पलटी झाली नाही. खाली जाताना एका झाडाला बस अडकली आणि तेथेच ती थांबली. अन्यथा बस थेट धरणाच्या डोहात कोळण्याची शक्यता होती. बस पाण्यात गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

अपघातानंतर वाहक व प्रवाशांनी  प्रसंगावधान राखत बसचा दरवाजा उघडून एकमेकांना आधारदेत सुरक्षितपणे बाहेर आले. याठिकाणी मोबाईल नेटवर्कसुद्धा नसल्याने मदतीसाठी कोणाला बोलावणे शक्य नव्हते. रात्रीचा अंधार, किर्र जंगल झाडी यातून एकमेकाला धरून कसेबसे सर्वजण दरीतून वर रस्त्यावर आले.  याचदरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या खासगी वाहनाला थांबवून प्रवासी मौदे येथे आपल्या घरी गेले. पोलिसांनी मौदे येथे जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली. स्थानिक डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. चालक युवराज पाटील आणि वाहक यांना पोलिसांच्या वाहनातून वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT