कणकवली ः कणकवली बाजारपेठेमध्ये शिरसाट कापड दुकानासमोर रविवारी दुपारी 12.30 वा. सुमारास टेम्पोचे चाक खोदलेल्या चरामध्ये रुतून बसले. शनिवारीसुद्धा याच ठिकाणी एक टेम्पो रुतला होता. सलग दोन दिवस बाजारपेठेत टेम्पो रुतून बसल्याने वाहतूकीची कोंडी झाली आणि त्याचा त्रास व्यापार्यांसह बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिक व वाहन चालकांना सहन करावा लागला.
कणकवली नगरपंचायत कडून बाजारपेठेतील रस्त्यावर या ठिकाणी असलेल्या पाईप लाईनचे लिकेज काढण्याकरिता दोन दिवसापूर्वी चर खोदण्यात आला होता. मात्र लिकेज मिळाले नसल्याने शिरसाट कापड दुकानासमोरील गटारा नजीक भागात असलेली पाईपलाईन खोदण्यात आली व पाईपलाईन खोदल्यानंतर या ठिकाणी रस्त्यापेक्षा उंचीची माती टाकून भराव करण्यात आला होता. मात्र त्या जागेवरुन वाहने जावू नयेत यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती.
या चरामध्ये शनिवारी एका टेम्पोचो चाक रुतल्याने टेम्पो अडकून पडला होता. त्यानंतर नागरीकांनी धक्का देवून रुतलेला टेम्पो बाहेर काढला. त्यानंतर दुसर्या दिवशी रविवारी दुपारी पुन्हा त्याच जागेवर दुसरा एक टेम्पो रुतून बसला. टेम्पोचे चाक खोदलेल्या त्या चरात अडकून पडले. या ठिकाणी दोन दिवस सतत वाहने रुतण्याचे प्रकार होत असल्याने त्यावर नगरपंचायतने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी व्यापारी, नागरिक व वाहन चालकांमधून करण्यात येत आहे.