कणकवली : फळ विक्रेत्यांना सूचना देताना मुख्याधिकारी. 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : उड्डाणपुलाखाली एका-एका विक्रेत्याची अनेक दुकाने!

मुख्याधिकाऱ्यांनी फटकारले; अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : कणकवली शहरातील पटवर्धन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली तसेच बाजारपेठेत करण्यात आलेली अतिक्रमणे आणि बांधकामांबाबत कणकवली नगरपंचायत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी स्वत: ॲक्शन मोडवर येत अतिक्रमणधारकांना दणका दिला.

नगरपंचायत कुणावरही अन्याय करणार नाही, परंतु बकालपणा वाढवणारी आणि वाहतुकीस अडथळा आणणारी अतिक्रमणे खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. या पाहणी दरम्यान उड्डाणपुलाखाली एका एका विक्रेत्याची अनेक दुकाने, स्टॉल आढळून आले. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांची उलटतपासणी घेत फटकारले. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमणे हटवावीत अन्यथा नगरपंचायत कारवाई करेल, असे सांगत ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्याधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर नं.प.कडून २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कणकवली बाजारेपठेसह शहरातील उड्डाणपुलाखाली व न. पं. हद्दीतील शासकीय जागांवर अनेकांनी अतिक्रमणे केली आहेत. नगरपंचायतीकडून ही अतिक्रमण हटविण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. नगरपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणारी अतिक्रमण हटाव मोहीम बुधवारी काही कारणास्तव राबविण्यात आली नाही.

मात्र गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव पथकाने धडक मोहीम राबवली. पटवर्धन चौकापासून ही मोहीम हाती घेण्यात आली. मोहिमेदरम्यान जरी प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली नसली तरी व्यापाऱ्यांना गटारहद्दीतील बांधकामे व छप्पर लावलेली दुकाने हटवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. यानंतर ही कारवाई कोणतीही पूर्वकल्पना न देता केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला.

मुख्य बाजारपेठेतील ‘ती’ कारवाई लक्षवेधी

विशेष म्हणजे मुख्याधिकारी बाजारपेठ परिसरात पाहणी करत असताना नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या घराखालील गटारावर साहित्य ठेवून दुकान मांडल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे कोणतीही गय न करता मुख्याधिकाऱ्यांनी ते साहित्य तात्काळ हटवण्यास भाग पाडले.

या घटनेमुळे अतिक्रमण हटाव मोहीम केवळ दिखाऊ नसून ती सर्वांसाठी समान निकषांवर आणि गांभीर्याने राबवली जात असल्याचा संदेश नागरिकांमध्ये गेला. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखालील हटाव मोहीम पथकाने सकाळी बाजारपेठेतील अतिक्रमण केलेल्या भागाची पाहणी करत संबंधित व्यापाऱ्यांना ते हटविण्यास सांगत आपला मोर्चा शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते एसटी बसस्थानक उड्डाणपुलाखालील जागेत वळवला. मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणे केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमणे हटवावीत; अन्यथा प्रशासन हटवेल, असा इशारा त्यांनी दिला.

एका-एका विक्रेत्यांनी थाटली अनेक दुकाने

उड्डाणपुलाखालील पाहणी दरम्यान एका-एका विक्रेत्यांची अनेक दुकाने आणि स्टॉल असल्याचे तसेच काहींनी भाजी व्यतिरिक्त आपला माल ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टॉल उभे केल्याचेही तसेच जागोजोगी प्लास्टीक आणि भाजीपाल्याचा कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. यावरून मुख्याधिकाऱ्यांनी अतिक्रमणर्त्यांना खडेबोल सुनावले. सदर स्टॉल हटविण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. यानंतर ही मोहीम छत्रपती शिवाजी महाराज चौकात वळवण्यात आली. या ठिकाणी देखील एकाच घरातील चार पाच जणांनी विविध व्यवसाय मांडल्याचे दर्शनास आले. याशिवाय याच ठिकाणी बाहेरून आल्याल्यांनी थेट पुलाखालील सर्विस रोडवर देखील आपली दुकाने जाहीरपणे थाटल्याचे दिसले. ती मुख्याधिकाऱ्यांनी हटविण्यास सांगत पुन्हा दुकाने लावल्यास कारवाईचे निर्देश देखील दिले.

फुटपाथलगत आढळला मोठ्या प्रमाणावर प्‍लास्‍टिक कचरा

दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर इतर जिल्ह्यातील व्यावसायिक आपली चारचाकी वाहने लावून व्यापार करत असल्याचे निदर्शनास आले. त्याचीही मुख्याधिकाऱ्यांनी पाहणी केली. त्यांनाही वाहतुकीस अडथळा आणू नये, कचरा टाकू नये, अशा सूचना देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गोवा-मुंबई सर्व्हिस रोडलगत फूटपाथ शेजारी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून आला. अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांनीच हा कचरा टाकल्याची चर्चा यावेळी रंगली. यापूर्वीही नगरपंचायतीने येथील कचरा हटवला होता. याची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ कचरा हटविण्याच्या सूचना दिल्या. तसेच यापुढे कोणी आढळल्यास याबाबतची माहिती पत्रकार, नागरिक तसेच व्यापाऱ्यांनी न.पं. कडे द्यावी, असे सांगितले.

फुटपाथवरील अतिक्रमणही हटविले

शहरातील अतिक्रमणांबाबत न. प. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. नगरपंचायतीकडून संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नियंत्रणाखाली पथकाची स्थापना केली आहे. बाजारपेठ ढालकाठी ते पटवर्धन चौक, सर्व्हिस रोडवरील दोन्ही बाजू, नरडवे रोड तसेच उड्डाणपुलाखाली अतिक्रमण केलेल्या व्यावासियकांना पूर्वीच नोटिसा बजवल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने मुख्य बाजारपेठ व उड्डाणपुलाखालील अतिक्रमण केलेल्या भागाची पाहणी केली. आप्पासाहेब पटवर्धन चौक ते एसटी बसस्थानक परिसरात सर्व्हिस रोडलगत असलेल्या फुटपाथांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यामुळे हे फूटपाथ अतिक्रमणमुक्त होणार आहे.

अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप न केल्याने कारवाई पूर्णपणे प्रशासकीय पातळीवर पार पडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे व्यापाऱ्यांनीही पालन केल्याचे चित्र संध्याकाळपर्यंत बाजारपेठेत दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT