एस. एम. हायस्कूलजवळील नाल्याला संरक्षक कठड्याची मागणी 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : एस. एम. हायस्कूलजवळील नाल्याला संरक्षक कठड्याची मागणी

कठडा नसल्याने प्रवासी व पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामांतर्गत एस.एम. हायस्कूलजवळ हॉटेल निखिल समोरील सर्व्हिस रोडलगत ड्रेनेज व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी नाला बांधण्यात आला आहे. मात्र, या नाल्यालगत संरक्षक कठडा उभारण्यात आलेला नसल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे तातडीने संरक्षक कठडा उभारण्याची मागणी प्रवासी, पादचारी तसेच नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत शहरात प्रवेश करण्यासाठी सर्व्हिस रोडची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच शहरातील ड्रेनेज व्यवस्था व पावसाळ्यातील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा यासाठी जुन्या नाल्यांची दुरुस्ती करून नव्याने नाले बांधण्यात आले आहेत. एस.एम. हायस्कूल परिसरातही अशाच प्रकारचा नाला बांधण्यात आला. मात्र त्याठिकाणी आवश्यक सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षक कठडा उभारण्यात आलेला नाही.

नाल्यालगत बसस्टॉप असल्याने येथे दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. विशेषतः रात्रीच्या वेळी बसची प्रतीक्षा करणारे प्रवासी मोठ्या संख्येने या परिसरात उभे राहत असतात. अशा परिस्थितीत संरक्षक कठडा नसल्याने एखादी दुर्घटना घडून प्रवासी नाल्यात पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नाल्यालगत संरक्षक कठडा उभारावा अशी मागणी जनतेतून केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT