कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता चिकित्सक आहे. जिल्ह्यातील पत्रिकारीतेने विकासाचे मोठे चित्र पाहिले आहे. समाज घडवण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पत्रकार, पोलिस व प्रशासन यांनी एकत्र येवून काम केले पाहिजे. आपल्या जीवनात आपण अनेक संघर्ष पाहिले आहेत. पण जीवनप्रवासातील बदलामध्ये पत्रकाराचे सानिध्य माझ्यासाठी मोलाचे ठरले, असे मत आ. नीलेश राणे यांनी कुडाळ पत्रकार समिती पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी केले.
कुडाळ तालुका पत्रकार समिती पुरस्कार वितरण सोहळा श्री क्षेत्र माणगांव दत्त मंदीर येथे सोमवारी झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.नीलेश राणे, कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, माणगांव सरपंच सौ.मनिषा भोसले, श्री दत्तमंदिर सचिव दीपक साधले, जिल्हा पत्रकार संघ सदस्य राजन नाईक, कुडाळ तालुका पत्रकार समिती अध्यक्ष विजय पालकर, जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी आदी उपस्थित होते.
आ. नीलेश राणे यांच्या हस्ते ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर उत्कृष्ठ जिल्हा पत्रकार पुरस्काराने पत्रकार विजय शेट्टी, कै. वसंत दळवी ग्रामीण पत्रकार पुरस्कार राजन सामंत, भैय्या साहेब वालावलकर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार कणकवली येथील छायाचित्रकार अनिकेत उचले यांना देऊन सन्मानित करण्यात आले. पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.
तहसीलदार वीरसिंग वसावे म्हणाले, सद्यस्थितीत पत्रकारिता क्षेत्राला वेगळे स्वरूप यायला लागले आहे. या क्षेत्रात काम करताना अभ्यास महत्त्वाचा असून कायदे विषयक ज्ञान असलेला पत्रकार हा एक घटक आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पत्रकारांनी निस्पृह व निपक्षपातीपणे काम करावे, असे आवाहन केले. परिषद सदस्य गणेश जेठे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता पारदर्शक, स्वच्छ व विकासाभिमुख असल्याचे सांगितले. सरपंच मनीषा भोसले यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा असून ते समाजाचे वास्तव रूप दाखवतात असे सांगितले. सत्कारला उत्तर देताना विजय शेट्टी यांनी भैय्यासाहेब वालावलकर यांच्या परखड पत्रकारितेची काही उदाहरणे विशद केली. पत्रकार राजन सामंत यांनी मनोगत व्यक्त केले. मनसे जिल्हाप्रमुख धीरज परब, कुणाल किनळेकर, शिक्षक संघटनेचे सावळाराम आदीं उपस्थित होते.
राज्यात एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा असेल ज्या ठिकाणी एकाच कुटुंबातील आम्हा तिघांना जनतेने निवडून दिलेलं आहे.राणे कुटुंबीयांवर लोकांनी जो विश्वास दाखवला आहे त्याची आपल्याला जिल्हा विकासाच्या माध्यमातून परतफेड करायची आहे.आपल्या स्वभावामध्ये व कार्यपद्धतीत पत्रकारांनी वेळोवेळी सुचवलेल्या सूचनांमुळे मोठा बदल घडला. पत्रकारांच्या सानिध्यात राहून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आपण लोकसभेमध्ये खासदार असताना ज्या विषयांवर भाषणे केली ते पत्रकारांच्या चर्चेतीलच विषय होते. त्यामुळे आपल्या जडण घडणीत पत्रकारांचे मोठे योगदान असल्याचे आ.नीलेश राणे यांनी सांगितले.