मळगाव : समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गतर्फे दिल्या जाणाऱ्या २०२६ च्या साहित्यिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ लेखक जयंत पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा कादंबरी पुरस्कार कादंबरीकार बबन मिंडे यांच्या 'स्टॅच्यू ऑफ डेमोक्रसी' (विश्वकर्मा पब्लिकेशन) या कादंबरीला, तर प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार कवी सुरेश राघव यांच्या 'जरुरी काम पुढील पिढीसाठी' (ललित पब्लिकेशन) या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस, समीक्षक प्रा. नितीन रिंढे आणि रणधीर शिंदे यांच्या निवड समितीने ही निवड केली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि प्रमुख कार्यवाह सुरेश बिले यांनी दिली.
समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे गेल्या काही वर्षांपासून विविध साहित्य प्रकारात पुरस्कार देऊन उत्तम साहित्यकृतीचा गौरव करण्यात येतो. यंदा कादंबरी आणि कविता या दोन विभागांत पुरस्कार देण्यात आले. कादंबरी या विभागात जयंत पवार पुरस्कारासाठी कादंबरीकार बबन मिंडे यांची निवड करण्यात आली. 'लँड माफिया', 'गावई', 'सत्याग्रह', 'गुलामराजा' अशा गाजलेल्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. दरम्यान, डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मालवण येथे होणाऱ्या सहाव्या समाज साहित्य विचार संमेलनात या पुरस्कारांनी कादंबरीकार बबन मिंडे आणि कवी सुरेश राघव यांना गौरविण्यात येणार आहे.