Sindhudurg Fire  
सिंधुदुर्ग

Sindhudurg Fire | लक्ष्मीपूजनानंतर दुर्घटना, जामसंडेतील गॅरेजला भीषण आग; लाखोंचे नुकसान!

संपूर्ण गॅरेजसह आतील साहित्य जळून खाक ; ग्रामस्थांच्या प्रयत्‍नांनी आगीवर नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

देवगड : जामसंडे येथील दीपक दत्ताराम लाड यांच्या ‘सद्गुरुकृपा ऑटोमोबाईल’ या गॅरेजला रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत संपूर्ण गॅरेजसह आतील साहित्य जळून खाक झाले. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील दीपक लाड यांचे जामसंडे हायस्कूलच्या बाजूला ‘सद्गुरुकृपा ऑटोमोबाईल’ या नावाने गॅरेज आहे. रविवारी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गॅरेज बंद केले आणि ते नांदगाव येथे जाण्यास निघाले. मात्र, काही वेळातच गॅरेजमधून आगीच्या ज्वाळा आणि मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे नजीकच्या दुकानदारांच्या व ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

गॅरेजला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. गॅरेजमध्ये पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, टायर, बॅटरी तसेच अन्य साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आग आटोक्यात आणताना मोठे प्रयत्न करावे लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. ग्रामस्थ, व्यापारी आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

या दुर्घटनेत गॅरेज मालक दीपक लाड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवगडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व घटनेची माहिती घेतली.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी माजी नगरसेवक नीरज घाडी, नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी, सुधीर तांबे, योगेश राणे, विशाल मांजरेकर, योगेश चांदोसकर, चंदन मामघाडी, जामसंडे व्यापारी संघाचे अध्यक्ष राजू पाटील, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम यांच्यासह स्थानिक व्यापारी, ग्रामस्थ, नगरपंचायतीचे अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि गुजराती समाजबांधवांनी मोलाचे सहकार्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT