बांदा : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-क्षेत्रफळवाडी परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत घनदाट जंगलात पट्टेरी वाघ दिसल्याची घटना घडली असून, वाघाचा चा वावर प्रवाशांच्या मोबाईल कॅमेर्यात कैद झाल्याने तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. उंच खडकावर निवांत बसलेल्या या वाघाच्या दृश्याने स्थानिक आणि पर्यावरणप्रेमींचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
दरम्यान पट्टेरी वााचे दर्शन झाल्याने वनविभागाने सतर्कता वाढवली असून हालचालींचा मागोवा घेण्यासाठी कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेतले आहे. ग्रामस्थ व प्रवाशांनी जंगलात अनावश्यक वावर टाळावा, तसेच वन्यजीवांच्या संरक्षणात सहकार्य करावे, असे आवाहन वन अधिकार्यांनी केले आहे. ‘वाघ डोळ्यांसमोर दिसलो’ अशी बातमी गावागावात पोहोचताच नागरिक उत्सुकतेने जंगलाकडे वळले, मात्र, पशुधन व शेतजमिनींच्या सुरक्षेची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली. वाघाचा अधिवास सुरक्षित ठेवताना स्थानिकांचे हित जपले जावे, अशी त्यांची अपेक्षा आहे.