इन्सुलीत कार अपघातात तरुणी ठार 
सिंधुदुर्ग

Sindhudurg Accident : इन्सुलीत कार अपघातात तरुणी ठार

अन्य तिघे गंभीर ; सर्वजण दादरा-नगर हवेली येथील

पुढारी वृत्तसेवा

बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील रंगीला ढाब्यासमोर भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात चौघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास झाली. या अपघातात कारमधून सुमारे २० फूट उंच हवेत फेकल्या गेलेल्या रणीता अविनाश नडगे (३६, रा. शिसदा फातरफाडा, दादरा व नगर हवेली) यांचा बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. तर फ्रान्सिस परेरा (४८, रा. म्हापसा), रसेल डिसोझा (४९, रा. मडगाव), आन्सल डिसोझा (६०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, एका जखमीवर बांदा प्रा. आ. केंद्रात उपचार करण्यात आले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मोटार बांद्याच्या दिशेने जात असताना इन्सुली परिसरात चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर मोटार बाऊन्स होऊन दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. अपघातात मोटारीचे मोठे नुकसान झाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मोटारीतून बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यास मदत केली. बांदा पोलिस तसेच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

अज्ञात वाहनाने धडक दिल्याची फिर्याद

कारचालक रसेल डिसोझा (रा. नवी मुंबई) यांनी बांदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सिल्वासा येथून गोव्याकडे जात असताना इन्सुली येथे मागून जीप अथवा अज्ञात वाहनाने कारला धडक दिल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास बांदा पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT