कुडाळ : प्रमोद म्हाडगुत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपात्र आणि नियमबाह्य पद्धतीने शिधापत्रिकांचा वापर करणाऱ्या कार्डधारकांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष 'अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम' राबवली जात आहे. शासकीय योजनेचा लाभ खऱ्या, गरजू आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा, या मुख्य उद्देशाने ही सखोल तपासणी मोहीम हाती घेतली जात असल्याची माहिती सिंधुदुर्गचे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी दिली.
गेल्या काही काळापासून जिल्ह्यात उत्पन्नाची मर्यादा ओलांडलेले, चारचाकी वाहने अथवा मोठी संपत्ती असलेले, तसेच मयत व्यक्तींच्या नावे अद्यापही रेशन धान्याचा लाभघेतला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर पुरवठा विभागाकडून संपूर्ण जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ही विशेष मोहीम राबवून रेशन कार्डाची आणि लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
एकूण धान्य उचल व वितरणाची टक्केवारी जिल्ह्याची एकत्रित आकडेवारी पाहता, ऑगस्ट २०२६ महिन्यासाठी शासनाकडून एकूण ३,६३९ मेट्रिक टन धान्य मंजूर झाले होते. त्यापैकी एफसीआयच्या गोदामांतून ३,५८९.३२ मेट्रिक टन धान्याची उचल झाली असून ही टक्केवारी ९८.६३ टक्के इतकी आहे. रेशन दुकानांपर्यंत ३,१२८.७८ मेट्रिक टन (८५.९८ टक्के) धान्य पोहोचले असून दुकानदारांमार्फत लाभार्थ्यांच्या हाती २,१८७.३० मेट्रिक टन (६०.१ टक्के) धान्य वितरित झाले आहे.
अपात्र कार्डधारकांवर होणार दंडात्मक कारवाई
आगामी काळात घरोघरी जाऊन तसेच रेशन दुकानांच्या स्तरावर कागदपत्रांची छाननी करून अपात्र शिधापत्रिका शोधल्या जातील. या तपासणीत जर कोणी चुकीची माहिती देऊन, आर्थिक उत्पन्न लपवून किंवा अपात्र असतानाही रेशनचे धान्य लाटत असल्याचे निदर्शनास आले, तर त्यांच्यावर आवश्यक त्या कायदेशीर आणि दंडात्मक कारवाया केल्या जातील. त्यामुळे शासकीय नियमांनुसार जे नागरिक अपात्र ठरतात किंवा ज्यांच्या कौटुंबिक उत्पन्नात वाढ झाली आहे, त्यांनी कोणतीही कारवाई होण्यापूर्वी स्वयंस्फूर्तीने आपल्या जवळच्या तहसील कार्यालय किंवा पुरवठा विभागाकडे आपली शिधापत्रिका जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे