ओरोस : आपल्या विविध मागण्या व स्मस्यांकडे शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत उपोषणास बसणार अशी तब्बल 119 निवदने जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. मात्र स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नीतेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांप्रती सकारात्मक भूमिका घेली, यामुळे तब्बल 103 आंदोलने स्थगित झाली. यामुळे स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत केवळ 16 उपोषण आंदोलने झाली. पालकमंत्री नीतेश राणे यांनी या सर्व आंदोलकर्त्यांची भेट देऊन त्यांच्या न्याय प्रश्नांबाबत योग्य तो तोडगा काढण्याचे आश्वासन देत संबधित अधिकार्यांना सकारात्मक कार्यवाहीसाठी आंदोलकां समक्षच निर्देश दिले.
या आंदोलकांमध्ये चौकुळ- खासकीलवाडी येथील माजी सैनिक विठ्ठल मालू गावडे यांनी रस्ता प्रश्नी जि. प. समोर उपोषण केले. 15 व्या वित्त आयोगातील कामे पूर्ण करून देखील देयक अदा केली नसल्याने कुंदे येथील शुभम पेडणेकर या कंत्राटदाराने जि. प. समोर उपोषण केले. कोचरा येथील प्रसाद विजय करलकर यांनी जनतेला त्रास होत असल्याने विविध सार्वजनिक प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. तुळस घाट रस्त्यावरील धोकादायक पुलामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने तेथे नव्याने पुल व्हावा या मागणीसाठी तुळस ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जमीन मिळावी या मागणीसाठी नेरूळ येथील माजी सरपंच सखाराम कदम यांनी उपोषण करीत लक्ष वेधले. सावंतवाडी तालुक्यातील सातोळी सजा दाणोली येथील फेरफार क्र. 597 मंजूर मेळाची फाईल मिळावी यासाठी सातोळीतील आत्माराम तायशेटे यांनी उपोषण केले.वेंगुर्ले कॅम्प म्हाडा कॉलनी येथील सेवानिवृत्त शिक्षिका नीलिमा गंगाधर प्रभू यांनी पेन्शन व भविष्य निर्वाह निधी मिळण्यासाठी उपोषण केले. तलाठी सजा पडेल यांनी चुकीच्या नोंदी केल्याबद्दल वारंवार तक्रार करूनही सुद्धा त्याची दखल घेत नसल्याने पडेल कॅन्टीन येथील संदीप वाडेकर यांनी उपोषण केले.
रेडी- हुडावाडी येथील सेवानिवृत्त पोलीस रमेश राणे यांनी आपल्या विविध मागण्यासाठी उपोषण करीत लक्ष वेधले. अवैध उत्खननाचा सर्वे नकेल्याने संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निगुडे येथील महेश सावंत यांनी उपोषण करून लक्ष वेधले.