कणकवली ः सिंधुदुर्गात एकीकडे स्थलांतरणामुळे खेडी ओस पडत असताना शहरांमध्ये मात्र लोकसंख्या लक्षणीय वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि आपत्कालीन परिस्थितीला तेवढ्याच सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी जिल्ह्यात अग्निशमन यंत्रणा देखील अद्ययावत करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत नगरपालिका आणि नगरपंचायतींकडे असलेल्या अग्निशमन बंबांवरच हा भार आहे. मात्र, सर्वत्रच स्वतंत्र अशा प्रशिक्षित कर्मचार्यांची वाणवा आहे. दरवर्षी घडणार्या आगीच्या घटना पाहता इतर भौतिक सुविधांबरोबरच जिल्ह्याची अग्निशमन यंत्रणाही तेवढीच सक्षम असणे काळाची गरज आहे.
मुंबईसारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वतंत्र अग्निशमन दल (फायर ब्रिगेड) कार्यरत असते. तर जिल्ह्यांमध्ये त्या त्या शहरातील नगरपालिका आणि नगरपंचायतींकडे अग्निशमन बंब असतात. सिंधुदुर्गात सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला या नगरपालिकांमध्ये आणि कणकवली कुडाळ या नगरपंचायतींमध्ये सुमारे 6 हजार लिटर पाणी क्षमतेचे मोठे अग्निशमन बंब आहेत. तर देवगड, वैभववाडी, दोडामार्ग या नगरपंचायतींकडे मिनी अग्निशमन बंब आहेत. कणकवली न. पं. कडे मोठा आणि मिनी बंब असून, स्कूटर फायर बंबही आहे. शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात ज्यावेळी दुकानांना किंवा घरांना आग लागण्याच्या घटना घडतात, त्यावेळी हेच अग्निशमन बंब त्याठिकाणी जाऊन आग विझवण्याचे व नियंत्रणात आणण्याचे काम करत असतात. या अग्निशमन बंबांसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नसून नगरपालिकांकडे किंवा नगरपंचायतींकडे असलेले कंत्राटी कर्मचारी यासाठी काम करतात. खरे तर अग्निशमन यंत्रणेसाठी स्वतंत्र चालक आणि प्रशिक्षित वर्ग असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी ही पदे मंजूर आहेत; परंतु ती भरलेली नाहीत.
या अग्निशमन यंत्रणेला केवळ आपत्कालीन घटनांवेळीच काम असते असे नाही, तर मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ नेत्यांचे दौरे, सभा तसेच मोठ्या यात्रा उत्सव किंवा अन्य मोठे कार्यक्रम यावेळी सज्ज राहावे लागते. त्यामुळे ही यंत्रणा तेवढीच सक्षम असणे आवश्यक आहे. त्यातच शहरातील लोकसंख्या वाढत असून, शहरांचा विस्तार होत आहे. शॉर्टसर्किट किंवा तत्सम कारणांमुळे घरे, दुकानांना तसेच सार्वजनिक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे इतर बाबींबरोबरच अग्निशमन यंत्रणाही तेवढीच तत्पर आणि अद्ययावत करणे काळाची गरज आहे.
नगरपालिका, नगरपंचायतींबरोबरच तालुका आणि जिल्हास्तरावरील प्रमुख कार्यालये, रुग्णालये या ठिकाणी देखील अग्निशमन यंत्रणा आवश्यक आहे. राज्य सरकारने केलेल्या महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियमांतर्गत अग्निशमन यंत्रणेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची तरतुद आहे. परंतु, ही पदे भरणे आवश्यक आहे. तरच ही यंत्रणा अधिकाधिक सक्षम होणार आहे. अग्निशमन यंत्रणेबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती आणि प्रशिक्षणही देणे आवश्यक आहे. त्यामुळे कमीतकमी नुकसान होऊन आपतग्रस्तांना दिलासा देता येणार आहे.