बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाने इन्सुली येथील तपासणी नाक्यावर गुरुवारी दिवसभरात केलेल्या तीन स्वतंत्र कारवायांमध्ये गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदा वाहतूक केली जाणारी विदेशी दारू आणि तीन चारचाकी कार असा एकूण 20 लाख 59 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इन्सुली तपासणी नाक्यावर तैनात पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गोव्यातून येणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान तीन वेगवेगळ्या चारचाकी कारमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे 33 बॉक्स (1086 बाटल्या) आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत 4 लाख 9 हजार 80 रुपये इतकी आहे.
या कारवाईत हुंदाई अल्काझार चारचाकी कार (एमएच 09 जीएम 7375) चालक संकेत प्रकाश वीर (रा. गारगोटी, जि. कोल्हापूर), हुंदाई सँट्रो चारचाकी कार (एमएच 09 एक्यू 4496) चालक अनिल माणिकराव खैरमोडे (रा. सांगली) तसेच इनोव्हा चारचाकी कार (एमएच 14 डीएन 0324) चालक गणेश शंकर भास्कर (रा. करवीर, जि. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या तिन्ही चारचाकी कारची अंदाजे किंमत 16 लाख 50 हजार रुपये असून मद्य आणि वाहनांसह एकूण 20 लाख 59 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला आहे. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री व सतीश चौगुले यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे करीत आहेत.