नदी-नाले तुडुंब; जनजीवन विस्कळीत
ताशी 60 कि.मी. वेगाने वारे वाहणार
मच्छीमारी नौका बंदरात थांबूनच
मळगाव : जिल्ह्यात शनिवारपासून सर्वदूर संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर समुद्र खवळला असून समुद्रातील उंच उंच लाटा किनार्यावर येऊन आदळत आहेत. समुद्रात ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. गेले दोन दिवस पडणार्या या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अरबी समुद्रातील वातावरणावर प्रतिकूल बनले असून समुद्र खवळला आहे. उंच उंच लाटा किनार्यावर येऊन आदळत आहेत.
खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी मच्छीमारांनी जाऊ नये असा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे. अरबी समुद्रातील प्रतिकूल वातावरण आणखी किमान तीन दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशा धोकादायक परिस्थितीत मच्छीमारीसाठी मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळले आहे. त्यामुळे वेंगुर्ले किनारपट्टीवरून मासेमारी करणार्या मच्छीमारी नौका गेले दोन दिवस बंदरात थांबून आहेत. मच्छीमारांनी आपल्या नौका वेंगुर्ले बंदर खाडीपत्रात सुरक्षितपणे नांगरून ठेवल्या आहेत.
मंगळवार 30 सप्टेंबरपर्यंत वादळी वार्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या कालावधीत समुद्रामध्ये ताशी 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित खाडीपत्रात सुरक्षित स्थळी ठेवाव्यात. समुद्रात जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाने दिला आहे.