हरकुळखुर्द तलावावर पर्यटकांची गर्दी (Pudhari File Photo0
सिंधुदुर्ग

Sindhudurg Tourist | हरकुळखुर्द तलावावर पर्यटकांची गर्दी

Overflowing Lake Harkulkhurd | हरकुळखुर्द येथील निसर्गाची भरभरुन साथ लाभलेल लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

अविनाश रासम

हरकुळखुर्द : हरकुळखुर्द येथील निसर्गाची भरभरुन साथ लाभलेल लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. तलावाच्या सांडव्यावरुन फेसाळत वाहणारा शुभ्रधवल पाण्यात आंघोळीचा मनसोक्त आनंद लुटता येत असल्याने तलाव परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

सह्याद्रीच्या कुशीत हिरव्या गर्द वनराईत 49 हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या तलावाचा जलाशय अत्यंत स्वच्छ व नितळ आहे. त्यामुळे येथे बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पसंती असते. तलाव सभोवताली असलेली हिरवी गर्द वनराई, तलावाच्या जवळच असलेल्या नारळ पोफळीच्या बागा तलावाच्या सौंदर्यात भर पाडत आहेत.

परिसरात पर्यटकांना चिमण्या, मोर, तितीर, साळुंखी, बगळा, माळढोक, रानकोंबडी आदी विविधारंगी पक्षांचे दर्शन होते. त्यांचे मधुर गुंजन येथील शांत वातावरणात पर्यटकांना भुरळ घालते. तलावाच्या मध्यभागी पाऊण एकर क्षेत्रात असलेले बेट सदृश्य परिसर तेथून होणारे सूर्योदय व सूर्यास्ताचे विलोभनीय दृश्य, तलावाच्या पूर्व दक्षिण किनार्‍यावर ग्रामदेवता पावणाईचे टुमदार मंदिर, अश्य निसर्गरम्य सौदर्यांमुळे या तलाव परिसराला पर्यटकांची वाढती पसंती आहे. तलाव परिसरात विविध वन्यप्राण्यांचेही दर्शन होत असते.

तलावात खडस, काढई, तिलापिया आदी माश्याच्या फिशिंगचा आनंद लुटता येतो. तलाव परिसर सुरक्षित असल्याने या ठिकाणी महिला व लहान मुल पर्यटनाचा आनंद लुटत असतात. सुट्टीच्या दिवशी येथे कौटुंबिक सहलींचेही आयोजन केले जाते. त्यामुळे या तलावाला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता मिळून तलाव परिसर विकसित करणे गरजेचे आहे.

प्राथमिक सोयी-सुविधा आवश्यक

फोंडाघाटवरून पर्यटनासाठी आलेल्या अश्विनी सांवत व अन्य महिला म्हणतात, आमच्यासारख्या गृहिणींना व लहान मुलांना हा तलाव परिसर पर्यटनासाठी सुरक्षित वाटतो. या तलावाचे र्सौेंदर्य अप्रतिम आहे. मात्र तलाव परिसरात चेंजिग रुमसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT