कुडाळ : कुडाळ शहरात डासमुक्त शहर उपक्रमांतर्गत नगरपंचायतीच्या माध्यमातून गप्पी मासे पैदास केंद्र व शहरात पहिल्या टप्प्यात गप्पी मासे सोडण्याचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. डासमुक्त शहर करण्याचा न.पं.चा संकल्प असून, पहिल्या टप्प्यात गप्पी मासे ओहोळामधील पाण्यात सोडण्यात आले आहेत. आता गप्पी मासे पैदास केंद्रामधून शहरातील नागरिकांना गप्पी मासे मोफत दिले जाणार आहेत. तसेच शहरात ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती उपनगराध्यक्ष किरण शिंदे व आरोग्य, शिक्षण व स्वच्छता समिती सभापती मंदार शिरसाट यांनी दिली.
अनंत मुक्ताई हॉल समोरील सार्वजनिक शौचालय लगत गप्पी मासे पैदास केंद्र करण्यात आले असून या पैदास केंद्रामध्ये गप्पी मासे प्रशासनाकडून सोडण्यात आले. त्यानंतर पहिल्या टप्प्यात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर व तुपटवाडी लगत असलेल्या ओहोळामधील पाण्यात हे गप्पी मासे सोडण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष किरण शिंदे, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका सौ. अक्षता खटावकर, आफरीन करोल, आरोग्य, शिक्षण व स्वच्छता समिती सभापती मंदार शिरसाट, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका सई काळप, ज्योती जळवी, आरोग्य निरीक्षक संदीप कोरगावकर, मुकादम दीपक कदम व संजय सोनवडेकर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, शहरातील मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. यासाठी न.पं.च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी, प्रशासना बरोबरच भाजप गटनेता विलास कुडाळकर यांचेही सहकार्य मिळाले. तसेच स्वच्छता निरीक्षक संदीप कोरगावकर व मुकादम दीपक कदम यांनी याकामी मोठी मेहनत घेतली आहे. आज गप्पी मासे सोडण्याच्या उपक्रमावेळी शहराच्या चांगल्या कामासाठी सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याचे चांगले चित्र दिसले.
मंदार शिरसाट म्हणाले, कुडाळ शहर मच्छर मुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे. या उपक्रमांतर्गत न.पं. मार्फत शहरात गप्पी मासे पैदास केंद्र व वाटप करण्यात येणार आहे. यासाठी मुळदे कृषी विद्यालय व आरोग्य-हिवताप विभागाचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च न करता कर्मचार्यांनी स्वखर्चाने व मेहनत घेऊन हे पैदास केंद्र निर्माण केले तसेच गप्पी मासे आरोग्य विभागाने पुरवले आहेत. या अंतर्गत शहरातील नागरिकांना हे गप्पी मासे पुरवले जातील.
विलास कुडाळकर म्हणाले, हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यामध्ये न.पं. कर्मचार्यांचा हिस्सा मोठा आहे. त्यांच्यामुळे हे पैदास केंद्र उभे राहिले आहे. नगरपंचायतीचा एकही रुपया खर्च न करता गप्पी मासे व पैदास केंद्र निर्माण झाले आहे. आम्ही विरोध केला होता तो या संभाव्य होणार्या खर्चाला. शहराच्या कोणत्याही चांगल्या कामांमध्ये आमचा विरोध असणार नाही. आमचे सहकार्यच राहील. सत्ताधारी आणि विरोधक असे न मानता शहराच्या चांगल्या कामासाठी एकत्र सोबत रहावे, असे सांगितले.
न.पं. कर्मचार्यांच्या सहकार्याने शहरातील टाकाऊ कचराकुंड्यांपासून गप्पी मासे पैदास केंद्र कर्मचार्यांनी स्वखर्चातून निर्माण केले आहे. या ठिकाणी गप्पी मासे सोडून त्यांची पैदास केली जाणार आहे. नंतर हे गप्पी मासे शहरात ठिकठिकाणी टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असून, नागरिकांनाही मोफत वाटप करण्यात येणार आहेत. दरम्यान न.पं. कर्मचार्यांच्या या प्रयत्नाला हातभार लावावा म्हणून भाजपा गटनेता विलास कुडाळकर यांनी गप्पी मासे पैदास केंद्राला आवश्यक असणारे ऑक्सिजनचे साहित्य दिले.