सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा पूर्णपणे अवैध धंदामुक्त करण्याचा निर्धार केलेल्या राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सावंतवाडी दौऱ्यात पोलिस प्रशासनाची महत्त्वाची बैठक घेतली. येथील शासकीय विश्रामगृहावर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासमवेत तब्बल ४० मिनिटे झालेल्या या चर्चेत मटका, जुगार आणि इतर सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी विशेष ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. पालकमंत्र्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील अवैध धंदेवाईकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
सावंतवाडी पं स. च्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सावंतवाडी येथे आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह पोलिस उपअधीक्षक आणि सावंतवाडी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. राणे यांनी सावंतवाडी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा तसेच अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांचा आढावा घेतला.
सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी सुरुवातीपासूनच अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून पोलिस दलाकडून जिल्ह्यात धडक कारवायांची मोहीम राबवली जात आहे.
ही मोहीम अधिक तीव्र करत अवैध धंदे मुळासकट उखडून टाकण्यासाठी आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांना काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. तसेच, या बैठकीत अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी ठोस ‘ॲक्शन प्लॅन’ निश्चित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीनंतर आता पोलिस प्रशासन अधिक आक्रमक होण्याची शक्यता असून अवैध व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.