Sindhudurg Groundwater Level pudhari photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg Groundwater Level : जिल्ह्यात भूगर्भातील पाणीपातळी 1 मिटरने खोलात

मालवण तालुक्यात गंभीर स्थिती; वैभववाडीकरांना 'नो टेन्शन'

पुढारी वृत्तसेवा

सिंधुदुर्ग : गणेश जेठे

अल-निनोच्या तडाख्याने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असताना कधी नव्हे तो यावर्षी पावसाला ओढ लागल्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या नियोजनानुसार संपूर्ण जिल्ह्यात हजारो वनराई बंधारे बांधण्याचे मिशन युध्दपातळीवर सुरूही आहे. असे असतानाच सप्टेंबर महिन्याच्या अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या पातळीचे मोजमाप करून पूर्ण झाले आहे.

यानुसार जिल्ह्यात सरासरी भूगर्भातील पाण्याच्या पातळीच्या तुलनेत यावर्षी १ मीटर ६ से.मी. ने पाण्याची पातळी खालावली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील मालवण तालुक्यामध्ये सर्वात जास्त गंभीर परिस्थिती असून देवगड आणि वेंगुर्ले तालुक्यामध्ये अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे कणकवली तालुका सह्याद्रीच्या पायथ्याशी असला तरीदेखील या तालुक्यात दीड मिटरने पाण्याची पातळी खालावली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर नदी, नाले, ओढे यांच्यातुन वाहणाऱ्या पाण्याला वनराई बंधारे बांधून थांबविण्याचे युध्दपातळीवर मिशन सुरू आहे. हे मिशन का अत्यंत गरजेचे आहे, हे भूजल सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भूजल सर्व्हेक्षण विभागाने नियोजनानुसार ३० सप्टेंबर रोजी भूगर्भातील पाण्याची पातळी मोजली. पाणलोट क्षेत्रानुसार भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणच्या विहिरींमधील किंवा इतर जलाशयांमधील पाण्याची पातळी मोजली जाते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील गेल्या पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या आकडेवारीनुसार सरासरी काढण्यात आली आहे. यानुसार ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील भूजल पातळी जमिनीपासून २ मीटर ७८ से.मी. पर्यंत असायला हवी. प्रत्यक्षात मात्र यावर्षी ती ३ मीटर ८४ से.मी. इतकी खोल गेली आहे. म्हणजेच १ मीटर ६ से.मी. ने सरासरी पेक्षा ती खालावली आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सरासरी भूजल पातळी जमिनीपासून ३ मीटर ४१ से.मी. इतकी आहे. यावर्षी ती ४ मीटर २६ से.मी. इतकी खोलवर गेली आहे. म्हणजेच ८५ से.मी. ने खालावली आहे. दोडामार्ग तालुक्यातील सरासरी भूजल पातळी ३.५१ मीटरवर आहे. ती यावर्षी ३५ से.मी. ने खाली जावून ३.८६ वर पोहोचली आहे. कुडाळ तालुक्यातील सरासरी पातळी २.१५ इतकी असली तरी यावर्षी ती ६८ से.मी. ने खाली जावून २.८३ वर पोहोचली आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील वेंगुर्ले तालुक्यात यावर्षीची भूजल पातळी ५.३३ मी. पर्यंत खाली गेली आहे. या तालुक्यात सरासरी भूजल पातळी ३.७० मीटरवर आहे. याचाच अर्थ यावर्षी सरासरी १ मीटर ६३ से.मी. इतके भूजल खोलात गेले आहे. देवगड तालुक्यात सरासरी ३ मीटर ७ से.मी. इतकी भूजल पातळी असते. यावर्षी १ मीटर ३२ से.मी. ने खाली जावून ती ४ मीटर ३९ से.मी. वर पोहोचली आहे. मालवण तालुक्यात मात्र सरासरीपेक्षा खुपच खाली भूजल गेले आहे. साधारणतः जमिनीपासून २ मीटर २ से.मी. पर्यंत मालवणात भूजल पातळी असते. यावर्षी ती दुपटीने २ मीटर २४ से.मी. ने खाली जावून ४ मीटर २६ से भी वर पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT