घोटगे येथे घरावर झाड कोसळून नुकसान 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : घोटगे येथे घरावर झाड कोसळून नुकसान

घराचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : मान्सूनपूर्व पावसासोबत आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घोटगे येथील नरेश नारायण काळबेकर यांच्या घरावर मोठे काजूचे झाड कोसळून घराचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावत अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

बुधवारी सकाळी व दुपारच्या सुमारास दोडामार्ग तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले. त्यानंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने तालुक्यात विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घोटगे गावात नरेश काळबेकर यांच्या घरालगत असलेले काजूचे झाड वाऱ्याच्या तडाख्याने उन्मळून थेट घरावर कोसळले. या घटनेत घराच्या छपरासह इतर भागांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले तसेच झाड हटविण्याचे प्रयत्न सुरू केले. मान्सूनपूर्व पावसामुळे उष्णतेपासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यामुळे फळबागा आणि इतर मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेषतः काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आता हवामानातील पुढील घडामोडींवर लागले आहे. हवामान खात्याने आगामी काळातही काही ठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT