कुडाळ : गणेशोत्सवातील परंपरा, पर्यावरण संवर्धन आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना समजावा, या उद्देशाने कुडाळ मधील क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत ‘फेस्टिव्ह अ सायंटिफिक लूक एक्झिबिशन’ या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले होते.
मुख्याध्यापिका मुमताज शेख यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. गणपतीची सुंदर मूर्ती, गौरी पूजनाची आकर्षक मांडणी तसेच विद्यार्थ्यांनी रंगचित्रांच्या माध्यमातून साकारलेली गणरायाची विविध रूपे यामुळे प्रदर्शनाची सुरुवातच लक्षवेधी ठरली. गणरायाच्या चरणी अर्पण करण्यात येणाऱ्या २१ पत्रींची ओळख, त्यांचे धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व विद्यार्थ्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. यामध्ये मधुमालती, माका, बेल, दुर्वा, बोर, धोत्रा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कन्हेर, रुई, अर्जुन, अपराजिता, डाळिंब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा आणि अगस्ती या पत्रींचा समावेश होता.
गौरी पूजन आणि ऋषिपंचमीची माहिती
गणेशोत्सवातील गौरी पूजन आणि सुपात ठेवला जाणारा वोवसा याची माहितीही विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातून दिली. गौरी पूजनासाठी लागणारे विविध साहित्य तसेच गौरीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. मातीच्या कुशीत वाढणारी विविध कंदमुळे, विशेषतः ऋषिपंचमीला वापरली जाणारी कंदमुळे, त्यांचे उपयोग व महत्त्व याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. गणेश चतुर्थी आणि ऋषिपंचमीचे महत्त्व, गणपतीला केळीच्या पानावर वाढला जाणारा नैवेद्य, हळदीच्या पानांचे महत्त्व यांसह विविध पारंपरिक प्रथा आणि त्यामागील वैज्ञानिक कारणे विद्यार्थ्यांनी समजावून सांगितली. या अनोख्या प्रदर्शनाला पालकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीचे पालकांनी कौतुक केले. सहा. शिक्षिका वैशाली शेट्टी, पूजा खानोलकर, पूर्वा राऊळ, पूजा कारेकर, जान्हवी नाईक आणि सूरज गोसावी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मेहनत घेतली.