मालवण : रविवारी बंदर जेटी येथे अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.  
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग किल्ला नौका वाहतुकीचा तिढा सुटला

२० ऐवजी ३० पर्यटकांना नेण्याची परवानगी; सेवा पुन्हा पूर्ववत

पुढारी वृत्तसेवा

मालवण : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे अलीकडेच झालेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी होणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीवर कडक निर्बंध लादले होते. मात्र, यावरून बंदर अधिकारी आणि होडी व्यावसायिक यांच्यात झालेला वाद आता मिटला असून, प्रवासी क्षमतेबाबत सुवर्णमध्य काढण्यात आला आहे.

रविवारी सकाळी मालवण बंदर विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक होडीतून केवळ २० पर्यटकांनाच नेण्याचे आदेश दिले होते. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे होडी व्यावसायिक आक्रमक झाले. त्यांच्या मते, सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू आहे आणि पर्यटकांची गर्दीही मोठी आहे. त्यातच पेट्रोलचे दर आणि उपलब्धता पाहता, केवळ २० प्रवाशांना घेऊन प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. या मुद्द्यावरून बंदर अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.या वादामुळे संतप्त होडी व्यावसायिकांनी निषेध म्हणून आपली सेवा काही काळासाठी बंद ठेवली होती.

यामुळे पर्यटकांना भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. आपली बाजू मांडताना प्रवासी होडी व्यावसायिक म्हणाले, आम्ही पर्यटकांना लाईफ जॅकेट घालण्याची सक्ती करत आहोत. शासनाने घालून दिलेल्या सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. अशा परिस्थितीत प्रवासी संख्या अचानक कमी करणे अन्यायकारक आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बंदर अधिकारी आणि होडी व्यावसायिक यांच्यात पुन्हा चर्चा झाली. या चर्चेअंती प्रशासनाने लवचिकता दाखवत एका होडीतून ३० प्रवासी नेण्यास परवानगी दिली. या निर्णयामुळे होडी व्यावसायिकांचे समाधान झाले असून वादावर पडदा पडला आहे. प्रवासी क्षमतेचा निर्णय जाहीर होताच बंद ठेवलेली किल्ला होडी वाहतूक सेवा पुन्हा एकदा उत्साहात सुरू करण्यात आली. यामुळे खोळंबलेल्या पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून, आता सुरक्षेचे नियम पाळून ३० प्रवाशांसह बोटी किल्ल्याच्या दिशेने रवाना होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT