मालवण : मालवण ते कणकवली दिशेने मासे विक्रीसाठी जाणार्या टेम्पोला मंगळवारी सकाळी आनंदव्हाळ येथील तीव्र उतारावर अपघात झाला. या अपघातात टेम्पोमध्ये बसलेल्या महिलांना किरकोळ दुखापत झाली. तर टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
टेम्पो चालक गणेश तांडेल हे मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे महिंद्रा पिकअप टेम्पोसह मच्छी विक्रेत्या महिलांना घेऊन मालवण येथून कणकवलीकडे जात होते. स. 9. 30 वा.च्या सुमारास टेम्पो मालवण-कसाल राज्यमार्गावरील आनंदव्हाळ उतारावर आला असता, समोरून ओव्हरटेक करत येणार्या कारला वाचवण्यासाठी त्यांनी अचानक ब्रेक लावला. परिणामी, टेम्पो रस्त्याबाहेर जात लगतच्या दगडी भिंतीवर आदळला. या धडकेने भिंत कोसळली. सुदैवाने टेम्पो लगतच्या झाडाला अडकल्याने तो दरीत कोसळण्यापासून वाचला व मोठी दुर्घटना टळली. अपघातात जखमी झालेल्या मच्छी विक्रेत्या महिलांना चौके प्रा.आ. केंद्र येथे उपचारासाठी नेण्यात आले. अपघाताची खबर मिळतात मालवण येथून मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बांधव अपघातस्थळी दाखल झाले. मच्छिमार बांधव, व्यवसायिक, मत्स्य एजंट यांनी त्याठिकाणी धाव घेतली. स्थानिक नागरिकही एकत्र आले. जेसीबीच्या मदतीने टेम्पोबाहेर काढण्यात आला. मालवण पोलिस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली. पोलिस जितेंद्र पेडणेकर, श्री. परब, अजय येरम तपास करत आहेत.