ओरोस : ‘एआय’च्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा डंका राज्यातच नव्हे तर देशात डंका पिटला गेला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व विभागामध्ये ‘एआय’चा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील एकमेव जिल्हा आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर बोलत होते. खेबुडकर म्हणाले, ‘एआय’ प्रणालीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा देशात अन्य राज्यात पोहोचला आहे.‘एआय’ प्रणालीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये एक्स-रे सिटीस्कॅन पेक्षा छोटे हॅन्ड वेल स्कॅनिंग मशिन वापरण्यात येत आहे. या मशिनच्या माध्यमातून रूग्णाच्या शरीराची तपासणी सॅटेलाईटच्या माध्यमातून करता येते. शिक्षण विभागांतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना‘एआय’ प्रणाली शिकविण्यात येत आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात जिल्ह्यातील रस्ते आणि विविध इमारती बांधण्यासाठी ‘एआय’ प्रणालीचा वापर यापुढे केला जाणार आहे.
21 ते 25 मार्च रोजी ‘सिंधू सरस’ कार्यक्रम
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून ‘सिंधु सरस’ कार्यक्रम कणकवली आणि कुडाळ या मध्यवर्ती ठिकाणी निश्चित करून घेण्याचा मानस आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने निधी उपलब्ध केला असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा ‘सिंधु सरस’ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. 21 ते 25 मार्च दरम्यान होणाऱ्या या ‘सिंधु सरस’ कार्यक्रमात जिल्ह्यातील बचतगटांची खाद्य संस्कृती व अन्य उपक्रमाचे नियोजन करण्यात येणार असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये उत्तम काम केलेल्या गावांना सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थानाही सन्मानित करण्याचा विचार आहे.