Fertilizer Stock  
सिंधुदुर्ग

Fertilizer Stock - सिंधुदुर्गात यंदा खताचा पुरेसा साठा

६१५ मे. टन युरिया तर १५४२ मे. टन संयुक्त खत उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

  • खरीप हंगामासाठी ५ हजार ५०० मे. टन युरिया मंजूर

  • तर ५ हजार २०० मे. टन संयुक्त खत मंजूर

  • मागणीप्रमाणे कंपन्यांकडून खत पुरवठा

कणकवली : लवकरच सुरू होणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणी प्रमाणे खत पुरवठा व्हावा यासाठी शासनाच्या कृषी विभागाने चोख नियोजन केले आहे. सिंधुदुर्गात यंदाच्या खरीप हंगामासाठी ५ हजार ५०० मे. टन युरिया तर ५ हजार २०० मे.टन संयुक्त खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ६१५ मे. टन युरिया तर १ हजार ५४२ मे. टन संयुक्त खतसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी काही प्रमाणात खत टंचाईची समस्या निर्माण झाली होती पण यंदा पुरेसा खतसाठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

खरीप हंगामात सिंधुदुर्गात भातशेतीसाठी आणि फळ बागायतीसाठी युरीया, संयुक्त खत आणि इतर खतांची मोठी मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते मिळण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जातात.

खतांचा कृत्रिम तुटवडा रोखण्यासाठी खत विक्रेत्यांना पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशिन अनिवार्य करण्यात आले आहे. सिंधुदुर्गात खाजगी वितरक, शेतकरी संघ आणि गावातील सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना खत पुरवठा केला जातो. खत विक्रीचा परवाना असलेल्या सर्वच विक्रेत्यांना पॉस मशिन बंधनकारक करण्यात आले आहे.

जूनपासून सूरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी मे महिन्यापासूनच शेतकरी खताची खरेदी करतात. सिंधुदुर्गात यंदा शेतकऱ्यांना वेळेत खत पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी खाजगी वितरक, शेतकरी संघ आणि सोसायट्यांची खताची मागणी त्या त्या कंपन्यांकडे नोंदविण्यात आली आहे. रस्ता मार्गाने तसेच आरपीएफ कंपनीकडून रेल्वे रेकने खत पुरवठा केला जातो. रेल्वे रेकसाठी १२०० टनांची मागणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात सद्यस्थितीत ३७१ मे. टन युरिया खत आले असून १ एप्रिलला शिल्लक साठ्यातील २४४ मे.टन युरीया खत मिळून सध्या ६१५ मे. टन युरियाचा साठा उपलब्ध आहे. तर सुफला १०.२६.२६, १९.१९.१९ या सारखे संयुक्त खत १ हजार ५४२ मे.टन सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना खताचा पुरवठा मागणीप्रमाणे होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT