कणकवली : कणकवली पोलिस स्टेशनच्या हवालदार स्मिता सचिन माने (३८) यांचा मृतदेह रविवारी दुपारच्या सुमारास बीडवाडी-हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी स्मिता यांची बहीण सौ. रेश्मा रवींद्र जाधव (रा. हुंबरठ - पिंपळवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्मिता यांचे पती तथा कणकवली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सचिन माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन यांनी शारीरिक, मानसिक त्रास दिल्याने स्मिता यांनी कंटाळून गळफास घेतला असावा किंवा यामागे घातपात असावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यामुळे स्मिता माने मृत्यू प्रकरणी गूढ वाढले आहे. दरम्यान, स्मिता माने यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर सीपीआर येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच यातील सत्यता स्पष्ट होणार आहे.
मूळ सांगवे-कनेडी येथील व सध्या कलमठ-नाडकर्णीनगर येथे राहणाऱ्या हवालदार स्मिता माने या दोन दिवसापासून बेपत्ता होत्या. याबाबत त्यांचे पती पो. कॉ. सचिन माने यांनी स्मिता माने या बेपत्ता असल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दिली होती. रविवारी दुपारच्या सुमारास बिडवाडी-हुंबरणे येथील एका काजू बागेत स्मिता यांचा मृतदेह झाडाच्या फांदीला ओढणीच्या सहाय्याने लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्मिता यांच्या माहेरच्या मंडळींनी कणकवली पोलिस ठाण्यात धाव घेतली. स्मिता यांचा पती सचिन माने हा सातत्याने स्मिता यांना त्रास देत होता. तो स्मिता यांचा शारीरिक छळ करायचा, असे माहेरच्यांनी पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव यांना सांगितले. त्यानंतर स्मिता यांची बहीण रेश्मा जाधव यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार सचिन माने यांनीच स्मिता बेपत्ता असल्याचे रेश्मा यांना कळवले. त्यानंतर रेश्मा या सचिन याच्या राहत्या घरी गेल्या असता घरातील फरशीवर मोठ्या प्रमाणात लांब केस पडलेले दिसले. अर्थातच स्मिता यांना मारहाण झाली आहे, असे रेश्मा यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी स्मिता यांचा मुलगा सार्थक याला विचारले असता सचिन यांनी स्मिता यांना रात्री पट्ट्याने मारहाण केली होती. त्यानंतर स्मिता बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्या होत्या, अशी माहिती सार्थक यांनी दिली, असे स्मिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे तर सचिन हे स्मिता यांचा कायमच शारीरिक, मानसिक छळ करायचे. त्यालाच कंटाळून स्मिता यांनी जीवन संपविले असावे, किंवा सचिन यांनीच घातपात केला असावा, असेही स्मिता यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार सचिन माने यांच्यावर कणकवली पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास कुडाळचे पोलिस निरीक्षक विकास बडवे करत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्मिता माने यांचा पती सचिन यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अटकेची प्रक्रिया सुरू होती. याप्रकरणी तपास करणारे कुडाळचे पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी माध्यमांना याप्रकरणी अधिक माहिती देण्यास नकार दिला.