सावंतवाडीः तडीपारीचा आदेश मोडून पुन्हा दुचाकीच्या डिकीतून गोमांसाची वाहतूक केल्याप्रकरणी सराईत संशयित मोहम्मद सरफराज बहुउद्दिन ख्वाजा (वय ४५, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) याला त्याच्या बाहेरचावाडा येथील राहत्या घरातून पोलिसांनी सापळा रचून पकडले. त्याच्या ताब्यातून गोमांस जप्त केले. न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संशयित गोमांस तस्करी आणि वाहतुकीत सराईत असून त्याला या गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांसाठी तीन जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. मोहम्मद ख्वाजा याला यापूर्वी गोवंश मास तस्करीत अनेक वेळा ताब्यात घेतले असून त्याने गुरुवारी संध्याकाळी पुन्हा तडीपारीच्या आदेशाचा भंग करत बाहेरचावाडा येथे गोमांसाची दुचाकीवरून बेकायदेशीर वाहतूक केली. याबाबत सावंतवाडी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पोलिसांची तीन पथके नेमून सापळा रचत त्याला रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्या गाडीच्या डिकीमध्ये २४ काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यात भरलेले २४.८०० किलोग्रॅम गोमांस सदृश्य मांस आढळून आले. बाजारात याची किंमत प्रति किलो ३०० रुपये दराने सुमारे ७,४४० रुपये इतकी आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी १ लाख १० हजार रुपये किमतीची दुचाकी, ७,४४० रुपयांचे मांस आणि १०० रुपये किमतीचा १४.६ इंच लांबीचा जुना वापरता लोखंडी कोयता असा एकूण १ लाख १७,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीवर यापूर्वीही सावंतवाडी पोलीस ठाण्यात मारामारी, विनयभंग, बालन्याय अधिनियमांतर्गत आणि गोवंश हत्या बंदी कायद्यानुसार असे एकूण ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व सहा. निरीक्षक हिंगे यांनी घटनास्थळी भेट दिली.