तळकट : हत्तींनी उन्मळून टाकलेले माड. pudhari photo
सिंधुदुर्ग

Wild elephants : हत्तींचा तळकट परिसरात धुडगूस

केळी, नारळ, सुपारीच्या बागा केल्या उद्ध्वस्त; भयग्रस्त शेतकरी हतबल

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग ः तळकट परिसरातील फळबागायतीत मागील काही दिवसांपासून जंगली हत्तींचे धुमशान सुरू आहे. परिणामी येथील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हत्तींच्या कळपाने केळी, नारळ, सुपारीच्या बागांना लक्ष्य करून उपद्रव माजविला आहे. स्थानिक शेतकरी भयभीत असून वन विभागाकडून तातडीच्या उपाययोजनेची मागणी होत आहे.

तिलारी खोर्‍यात हत्तींच्या दोन कळपांचा वावर होता. यातील एक कळप दहा दिवसांपूर्वी तळकट परिसरात दाखल झाला. त्यामागोमाग दुसरा कळपही तेथे दाखल झाला. सध्या तेथे सहा हत्तींनी बस्तान मांडले आहे. हे हत्ती दिवस रात्र येथील शेतकर्‍यांच्या बागायती पायदळी तुडवून त्यांची नासधूस करत आहे. काही ठिकाणी संपूर्ण बाग नष्ट झाली असून शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हत्तींची हालचाल अधिक असल्याने स्थानिक ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

मंगळवारी रात्रभर हत्तींच्या कळपाने विविध बागांमध्ये धुडगूस घातली. यात महेश जानबा देसाई यांच्या नारळ व सुपारीच्या बागेत घुसून प्रचंड नुकसान केले. काही माड उन्मळून टाकले तर काही सुपारीची झाडे उद्ध्वस्त केली. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरात दिवस-रात्र हत्ती नुकसान करत असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वनविभागाची उपाययोजना तोकडी पडत असून शेतकर्‍यांचे उत्पन्नाचे साधनच नष्ट होत आहे. हत्तींना येथून पिटाळून लावण्याची मागणी होत आहे.

नारळ, सुपारी पासून मिळणार्‍या उत्पन्नावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. या परिसरात दाखल होणारे हत्ती आमच्या बागेतूनच जातात. त्यामुळे उपजीविकेचे एकमेव साधन हत्ती उद्ध्वस्त करत आहे. हत्तींना रोखण्यासाठी आम्हाला रात्र जागून काढावी लागते. हत्ती येऊन बाग उद्ध्वस्त करतात आणि अनेक वर्षांचे आमच्या कष्टाचे श्रम एका रात्रीत वाया जाते.
महेश जानबा देसाई, नुकसानग्रस्त शेतकरी (तळकट)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT