सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांसमोर उभे राहिलेले शिक्षकांच्या कमतरतेचे मोठे संकट पालकमंत्री नीतेश राणे यांच्या विशेष पुढाकारामुळे टळले आहे. इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गांसाठी केवळ २० विद्यार्थी संख्या असतानाही ३ शिक्षकांना मंजुरी देण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्र्यांनी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ९० शाळांना जीवदान मिळाले असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.याबद्दल सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहे.
'संच मान्यते'च्या जाचक अटींतून जिल्ह्याला सवलत
'संच मान्यता २०२४' च्या नवीन नियमांमुळे कमी पटसंख्या असलेल्या अनेक ग्रामीण शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली होती. यामुळे दुर्गम भागातील शाळा शिक्षकांविना 'पोरक्या' होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पालकमंत्री नितेश राणे यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वर्षाची विशेष सवलत मिळवून दिली आहे.
शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी उचलले पाऊल
सिंधुदुर्ग जिल्ह्याने शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच आपला दबदबा राखला आहे. २०२५ च्या निकालात ९९.३२ टक्के गुणांसह जिल्हा राज्यात प्रथम आला होता. हाच यशाचा आलेख कायम राखण्यासाठी शिक्षकांची पदे रिक्त न ठेवण्याचा निर्णय अत्यंत कळीचा ठरणार आहे.
शिक्षण प्रसारक मंडळाकडून कृतज्ञता व्यक्त
या निर्णयाबद्दल सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी पालकमंत्र्यांचे जाहीर आभार मानले आहेत. मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी प्रत्यक्ष पालकमंत्र्यांची भेट घेऊन पत्राद्वारे कृतज्ञता व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या या संवेदनशील निर्णयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे.