जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे 
सिंधुदुर्ग

Sindhudurg News| दुष्काळात पाणीपुरवठ्यासाठी नद्यांवर होणार मातीचे बंधारे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रस्तावित जागांची पाहणी

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विविध नद्यांवर जलसंपदा विभागामार्फत मातीचे बंधारे उभारण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यांमुळे नदीपात्रात पाण्याचा साठा निर्माण होऊन आजूबाजूच्या गावांमधील पाणीपुरवठा योजनांना आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीतही मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने हे नियोजन करण्यात आले आहे.

या कामांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमधील संभाव्य जागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बंधाऱ्यांसाठी योग्य जागांची निवड, नदीपात्राची भौगोलिक रचना, पाणीसाठ्याची क्षमता तसेच लगतच्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांची आवश्यकता या बाबींचा विचार करून तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याच अनुषंगाने तेरेखोल नदीवरील बांदा येथील एमजेपी पूल, इन्सुली येथील तुळसाण पूल आणि पिंपळस्थान (विलवडे) या संभाव्य ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्राची स्थिती आणि बंधारे उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती दिली.

जिल्ह्यातील विविध नद्यांवर मातीचे बंधारे उभारल्यामुळे नदीपात्रातील वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे शक्य होणार आहे. परिणामी, परिसरातील विहिरी आणि भूजल पातळीला आधार मिळण्याबरोबरच गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांसाठीही पाणी उपलब्ध होईल. विशेषतः उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरू राहील, अशा पद्धतीने बंधाऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध जलस्रोतांचे बळकटीकरण, पाण्याचा स्थानिक पातळीवर साठा आणि त्याचा नियोजनबद्ध वापर यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यादृष्टीने बंधाऱ्यांची कामे तांत्रिक निकषांनुसार आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, कार्यकारी अभियंता योगेश पाटील, सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील, मंडल अधिकारी, ग्राम महसूल सहाय्यक, ग्रामसेवक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT