रत्नदीप गवस
दोडामार्ग : तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाचा उजवा व डावा कालवा गेले अनेक वर्ष फुटत आहे. शिवाय तालुक्यातील अनेक गावांतून गेलेल्या कालव्यांना गळती लागल्याने सुपीक जमिनी नापीक होत आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक दश, पंचक्रोशी धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत. तालुक्यातील बहुतांश गावांतील शेतकऱ्यांची कित्येक वर्षाची पाण्याची मागणी असून देखील अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत. कालवे फुटून गळती लागली की फक्त पाहणी करण्यास अधिकारी येतात आणि गायबच होतात व मग त्यां पत्ताच नसतो. अशा बेजबाबदार अधिकारी वर्गामुळे आजवर दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत.
तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या पाण्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील बरीच गावे, हरित क्रांती दिशेने वाटचाल करीत आहेत. केळी, अननस, माड, सुपारी यांसह उन्हाळी पिके धरणाच्या पाण्यावर शेतकरी करत आहेत. काही गावांत पाणी पोहोचले असताना मात्र तालुक्यातील बरीच गावे पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
पिकुळे, खोक्रल, उसप, झरेबांबर केर, मोर्ले, माटणे दशक्रोशी अशी अनेक गावे पाण्याची मागणी करत आहेत. मात्र गेले अनेक वर्षे या गावांना पाण्याविना वंचित ठेवले आहे. त्याला फक्त आणि फक्त अधिकारी वर्गाची असलेली उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे. कालवा विभागाचे अधिकारी आजवर पाण्यापासून वंचित राहिलेल्या किती गावात गेलेत? आणि मायनर कालवे असो की शेतपाट असो त्याबाबत स्थानिकांना भेटून कधी सर्वे केला असेल? हा मात्र संशोधनाचा विषय आहे. अधिकारी अशा गावात जाऊन स्वतःहून किती वेळा पुढाकार घेतला असेल हे त्यांनी जाहीर केलेले बरे. कारण अधिकारी वर्ग कालवे फुटले किंवा गळती लागले की ते येतात व दिखावेगिरी करतात आणि जातात. कालव्यांना ठिकठिकाणी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाय सुपीक जमिनी नापीक देखील होत आहे.
काही महिन्यांपूर्वी माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी अभियंता जाधव यांनी मी बघतो, पाहणी करतो, दुरुस्ती करतो असेच शेतकऱ्यांना आश्वासन दिले. शिवाय संपूर्ण कालवा दुरुस्ती देखील लवकरच हाती घेण्यात येईल असे सांगितले. पण यावर कार्यवाही होण्यास कित्येक वर्षे लोटतील हे सांगता येणारे नाही. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झालेल्या असतील. दुसऱ्या बाजूने जी गावे धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत त्यांना देखील अधिकाऱ्यांच्या उदासीनतेचा फटका बसलेला दिसेल.
तिलारी नदीचे पाणी मणेरी येथून वेंगुर्लापर्यंत नेण्यात आले आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर करून आणली होती. आता ही योजना कार्यान्वित देखील झाली आहे. दोडामार्ग तालुक्यातील पाणी वेंगुर्ले पर्यंत जाते, तर तालुक्यामधील गावे धरणाच्या पाण्यापासून वंचित का? असा सवाल तालुका वासियांमधून विचारला जातो आहे.
कालव्यांची अनावश्यक दुरुस्ती करून शासनाचा निधी उगाच खर्च करण्यात अधिकारी पुढाकार घेत आहेत. जर अधिकाऱ्यांनी कालव्यांना ज्या ज्या ठिकाणी गळती लागली, त्या ठिकाणी जर निधी खर्च केला असता तर शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या नसत्या. शिवाय जी अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत, त्या गावात अधिकारी शेतकऱ्यांना घेऊन मायनर कालवे, शेतपाट, पाईपलाईनचा सर्वे केला असता तर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचून उन्हाळी पिके घेऊन शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले असते. पण जी-जी गावे आज धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे त्याला फक्त अधिकारी वर्गाची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप शेतकरी वर्ग करत आहे.