जत शहर : उटगी (ता. जत) येथे शुक्रवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. 25 पेक्षा जास्त झाडे पडली. वादळाने अनेक घरांचे छत उडले, भिंती कोसळल्या, विजेचे खांब पडले. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत दोन महिलांसह एक पुरुष जखमी झाला असून, वीज आणि पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.
बागायतदार, शेतकरी संकटात
वादळाचा मोठा फटका फळबागांना बसला असून शरणाव्वा लिगाडे यांच्या दोन एकर केशर आंबा बागेची फळझड झाली आहे. भीमसिंह रजपूत यांच्या दोन एकर द्राक्षबागेचेही मोठे नुकसान झाले आहे. निगडी बु. येथील खुबसिंग भामलू राठोड आणि तुकाराम लमाण यांच्या घरावरील व गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. बेदाणा शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने तयार बेदाणा भिजून मोठे नुकसान झाले आहे.
वीज, पाणीपुरवठा विस्कळीत
वादळामुळे वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून संपूर्ण परिसरात सुमारे 8 ते 10 विजेचे खांब कोसळले आहेत. औजी वस्ती परिसरात आठ खांब पडल्याने घरांवर व रस्त्यांवर वीजतारा पसरल्या असून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीजवळील ट्रान्स्फॉर्मरवर झाड कोसळल्याने पाणी पुरवठाही ठप्प झाला आहे.
अनेक घरांचे पत्रे उडाल्याने आणि भिंतींना तडे गेल्याने घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य पावसात भिजून खराब झाले आहे. भरमू वाक्षे, माळाप्पा गडदे, केंचाप्पा हाके, भीमान्ना हक्के, उमान्ना आवजी, नागप्पा आवजी, मल्लिकार्जुन टिळे, लखाप्पा आवजी, नितीन आवजी, रामन्ना हाके, तुकाराम कोळी, काशीबाई कळी, चंद्राम केसगोंड, श्रावणकुमार ढगारे, दत्तात्रेय डवरी, संजय निगडी यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरावरील छतच उडून गेल्याने घरातील धान्यही भिजले. तलाठी एम. एस. माळी, कोतवाल धानापा कोळी आणि अल्लाबक्ष मुल्ला यांनी घटनेचे पंचनामे सुरू केले आहेत.