दोडामार्ग ः दोडामार्ग शहरातील अपघातप्रवण आणि धोकादायक ठिकाणी, तसेच शाळेजवळ त्वरित गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत. त्यांच्यावर व इतर गतिरोधकांना स्पष्ट दिसणारे सफेद पट्टे मारावेत आणि चालकांना सतर्क करणारे सूचना फलक लावावेत. तसेच रस्त्यालगत असणारी धोकादायक झाडे त्वरित तोडावी, अन्यथा येत्या आठ दिवसात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, शिंदे शिवसेना शहर प्रमुख योगेश महाले व राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रमुख गौतम महाले यांनी निवेदनाद्वारे सार्व. बांधकाम विभागाला दिला आहे.
तालुक्यातील झरेबांबर तिठा येथे गतिरोधक नसल्यामुळे सहा महिन्यांपूर्वी अपघात होऊन एका चिमुकलीला प्राणास मुकावे लागले होते. अशा अनेक घटना तालुक्यात वारंवार होत आहेत. मात्र सा. बां. उपविभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दोडामार्ग शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीचा वेग अधिक असून, त्या ठिकाणी गतिरोधकांचा अभाव आहे. परिणामी अनेकदा लहान-मोठे अपघात घडत आहेत. काही ठिकाणी आधी गतिरोधक होते, मात्र रस्ता नूतनीकरणानंतर पुन्हा गतिरोधक टालेलेे नाहीत.
शहरातील आयी मार्गावरील प्राथमिक शाळा, रहदारीच्या ठिकाणी गतिरोधक बसवणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नव्याने गतिरोधक बसवावेत. तसेच पूर्वी बसविण्यात आलेल्या गतिरोधकांवर प्रतिबिंबित रंगाचे (रेफ्लेक्टिव्ह) सफेद पट्टे मारावेत. रात्रीच्या वेळेस आणि पावसाळ्यात वाहनचालकांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी या गतिरोधकांजवळ सूचना फलक लावावेत.आवश्यकता आहे. त्यामुळे गतिरोधकांना सफेद पट्टे मारून सूचनाफलक लावावेत.
सार्व. बांधकाम उपविभागाने ही कामे तातडीने हाती घेऊन ती पूर्ण करावी व भविष्यात होणारे संभाव्य अपघात टाळावेत. अन्यथा येत्या आठ दिवसात रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर, शिंदे शिवसेना शहर प्रमुख योगेश महाले, राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रमुख गौतम महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.