‘धक्काबुक्की’नंतर आमसभा तीन तास सुरळीत  
सिंधुदुर्ग

Sindhudurg News : ‘धक्काबुक्की’नंतर आमसभा तीन तास सुरळीत

आ. दीपक केसरकरांकडून अधिकाऱ्यांना खडेबोल; ठेकेदारांवर कारवाईचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका आमसभेत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अंगावर जात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सावंतवाडी विधानसभा उपाध्यक्ष रविकिरण गवस यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. हा प्रकार चक्क आ.दीपक केसरकर यांच्या समोर घडला. आमसभेत राडा घडल्याने बैठकीचा सुरुवातीस वातावरण तंग झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. शिवसैनिकांनी केलेल्या दादागिरीमुळे आ. केसरकर यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली .

तब्बल ११ वर्षानंतर गुरुवारी दोडामार्ग तालुक्याची आमसभा आ. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे प्रास्ताविक स्वतः केसरकर करत असताना मध्ये रविकरण गवस उठून बोलू लागले. गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते, मग त्यांना बैठकीचे निमंत्रण आपल्या सही करत कसे पाठवले? ते निलंबित आहेत की त्याचे निलंबन मागे घेण्यात आले? अशी विचारणा करत होते. आ. केसरकर यांनी त्यांना वारंवार बसण्याची विनंती केली. तरीही श्री.गवस वारंवार उठून उठून बोलत होते. यामुळे शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले. त्यांनी श्री. गवस यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे सभागृहात हलकल्लोळ माजला. वेळीच पोलिस आले आणि पुढील अनर्थ टळला. आमसभा घेता की मारामाऱ्या करायला येता? असाच सूर सभेस उपस्थित सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केला. दरम्यान, आ. केसकर यांनी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

पुढे आमसभा सुरळीत सुरू झाली. मागील सभेतील विषयांचे वाचन करण्यात आले. यावेळी अनेक विकासकामे पूर्णत्वास झालेली दिसली. अनेकांनी प्रत्यक्ष बोलायचे होते, काहीजण बोलत असताना आ. केसरकर यांनी मध्येच बोलू नका, अजेंड्या वरील विषय झाले की प्रत्येक विषयावर बोला. तसेच आयत्यावेळी विषय येतील तेव्हा बोला असे सांगितले. पिकुळे पंचक्रोशीला पाणी मिळावे याकडे माजी उपसभापती बाळा नाईक यांनी लक्ष वेधले. तसेच सिंधुदुर बँक माजी संचालक प्रकाश गवस यांनी सुद्धा पिकुळे पंचक्रोशीला सात मीटर उंची असल्याने अडचण येत आहे याकडे लक्ष वेधले.

उबाठाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी देखील पंचवीस वर्षे आम्ही माटणे पंचक्रोशीला पाणी मिळणार म्हणून लोकांना सांगत आहोत, पण ते कधी मिळणार? सर्वेक्षणसाठी ४५ लाख रुपये निधी मंजूर केला तर आतापर्यंत सर्वेक्षण का झाले नाही? असा सवाल केला. राजेंद्र म्हापसेकर यांनी झरेबांबर येथे ५० ते ६० लाख निधी मंजूर असलेली नळपाणी योजना, ठेकेदारानेअर्धवट ठेवली आहे, या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी केली. संतोष मोर्ये यांनी तिलारी सिंचन कार्यालय चराठेत आणि येथे तिलारीत कोण भेटत नाही? याकडे लक्ष वेधले. जि. प. माजी सभापती अंकुश जाधव यांनी तिलारीतील अधिकारी कामे पुन्हा पुन्हा तीच दाखवून निधी चा अपव्यय करत आहेत, यामुळे पहिल्यांदा श्वेतपत्रिका काढा, आणि मगच बैठका घ्या, असे सांगितले.

आपण लाखो रुपये निधी मंजूर करतो, पण काही ठेकेदार कामे निकृष्ट करतात, अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाका , त्यांना मस्ती झाली आहे , आपण त्यांची नावे देतो असे आ. केसरकर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. राजेंद्र म्हापसेकर यांनी मणेरी -वेंगुर्ले नळपाणी योजनेप्रमाणेच खानयाळे महालक्ष्मी येथून एखादी नळपाणी योजना तालुक्यात राबवावी, अशी मागणी केली. जि. प. माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दोडामार्गात गोव्याच्या धर्तीवर फायर ब्रिगेड स्थापन करण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT