रत्नदीप गवस
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ( ग्रामीण ) 2024 -25 , 2025 -26 या वर्षात 896 घरकुले मंजूर आहेत. यातील जवळपास 154 घरे पूर्ण झाली असून 521 घरांची कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती पंचायत समितीमधून देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. देशातील सर्वसामान्य कुटुंब आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहता नाही हे त्यांचे स्वप्न आहे. गेल्या दहा वर्षात अनेकांची हक्काची घरे प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सत्यात उतरली आहेत. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी दोडामार्ग तालुक्यात पंचायत समितीकडून सुरू आहे. ग्रामपंचायत एकूण 36 असून प्रत्येक गावात घरकुले मंजूर आहेत. गाव स्तरावर सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून सातत्याने घरकुलांचा आढावा घेण्यात येतो आहे. सर्वाधिक घरकुले ग्रा.पं तेरवण मेढे (99) , माटणे (79), आयी (102), पिकुळे ( 55) मंजूर आहेत. घरकुलसाठी 1 लाख 20 हजार रू. अनुदान मंजूर आहे. तालुक्यात दोन वर्षात 896 घरकुले मंजूर झाली आहेत. यातील 154 घरांचे काम पूर्ण झाले आहे तर 521 घरांचे काम प्रगतीपथावर आहे.123 घरांचा चौथरा पूर्ण असून 98 घरांच्या भिंती पूर्ण झाल्या आहेत. सर्व गावात घरकुले मंजूर झाली असल्याने गवंडी, जांभा दगड मिळणे थोडे अवघड झाले आहे. यामुळे काही लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे सुरू होण्यास विलंब होतो आहे.
विविध घरकुल लाभार्थ्यांना स्वामित्वधन (रॉयल्टी) न आकारता वाळू उपलब्ध करून देणे, तसेच वाळू गट लाभार्थ्यांची यादी गटविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर तहसीलदारांनी ऑनलाईन पास वाळू गटाला उपलब्ध करून याची नोंद महाखनिज प्रणालीवर देण्यात यावी, यानंतर एक महिन्याच्या आत वाळू उचलण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. पण याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल तेव्हा. यामुळे वाळू मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत आले आहेत.