दोडामार्ग नगराध्यक्षांसह 60 जणांवर गुन्हे 
सिंधुदुर्ग

Sindhudurg : दोडामार्ग नगराध्यक्षांसह 60 जणांवर गुन्हे

नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मंडल अध्यक्ष दीपक गवस यांच्यासह पाचजणांना अटक; अन्य फरार

पुढारी वृत्तसेवा

दोडामार्ग ः गोमांस वाहतूक करत असल्याच्या संशयावरून तिलारी - पाताडेश्वर मंदिराजवळ कार पेटवून देत एका तरुणाला जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी सुमारे 60 जणांविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, भाजप दोडामार्ग मंडल अध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांसह महेंद्र खरवत, वैभव रेडकर व विजय कांबळे या पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. दोडामार्ग न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निजामुद्दीन मोहम्मद सय्यद कुरेशी हा गुरुवारी दुपारी स्विफ्ट कार घेऊन तिलारी घाटमाथ्यावरून दोडामार्गकडे येत होता. वीजघर चेक पोस्ट येथे तो आला असता पोलिसांनी त्याची कार तपासणीसाठी थांबवली असता कारमध्ये प्राण्याचे मांस आढळून आले. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार, पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत हे पुढील चौकशीसाठी त्याला दोडामार्ग पोलिस ठाण्याकडे आणत असताना, तिलारी-पाताडेश्वर मंदिराजवळ 50 ते 60 जणांच्या जमावाने त्यांची कार रस्ता अडवली.

बेभान झालेल्या या जमावाने दगड व लाकडी दांड्याच्या सहाय्यने कारच्या काचा फोडून तोडफोड केली. कार मधून गोमांस वाहतूक करण्यात येत आहे, याला मारा. पेट्रोल आणा रे, याला पेटवून देऊया, असे ओरडत जमावातील काही जणांनी निजामुद्दीन याला गाडीबाहेर ओढून लाथाबुक्यांनी, लाकडी दांड्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर जमावाने कारवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली.घटनेदरम्यान पोलिस कॉन्स्टेबल परशुराम सावंत हे शासकीय गणवेशात आणि कर्तव्यावर आहेत, हे माहिती असताना त्यांची अडवणूक करून जमावाने शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजपा मंडल अध्यक्ष दीपक गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महेंद्र खरवत, वैभव रेडकर, विजय कांबळे व इतर 60 अज्ञातांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकारी दाखल

या घटनेची माहिती कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक संजय दराडे व पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर तात्काळ दोडामार्ग येथे दाखल झाले. संपूर्ण तालुक्यात दंगल पथक नियंत्रकांसह मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला. तालुका मुख्यालय इमारतीला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले. जिल्हा अति.पोलिस अधीक्षक नयोमी साटम या शुक्रवारी दिवसभर दोडामार्ग पोलिस ठाण्यात ठाण मांडून होत्या.

भाजपच्या पदाधिकारी ताब्यात

पोलिसांनी प्रथम दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर भाजपा मंडल अध्यक्ष दीपक गवस, यांसह इतर दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तालुका मुख्यालय इमारतीच्या गेटवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून कोणालाही आत न सोडण्याच्या सूचना अति.पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी केल्या. यावेळी तालुका मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात भाजपा पदाधिकारी व युवकांचा जमाव होता.

पत्रकारांच्या मध्यस्थी नंतर मुख्यालयासमोरील बंदोबस्त हटवला

गुरूवारी रात्री 10 वा.च्या सुमारास अति. पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी मुख्यालय इमारतीच्या दोन्ही गेटवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून कोणालाही आत न सोडण्याची सक्त सूचना केली. याची अंमलबजावणी दुसर्‍या दिवशीही सुरू राहिल्याने मुख्यालयात येणार्‍या अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. पत्रकारांना देखील आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र पत्रकारांनी पोलिस प्रशासनाची चूक त्यांच्या निदर्शनास आणून देत या मुख्यालय इमारतीत पोलिस ठाणे व्यतिरिक्त तहसील, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक, आधार केंद्र, कृषी विभाग, उप कोषागार अशी विविध कार्यालयात आहेत. त्यामुळे दररोज येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. हे निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिस बंदोबस्त सर्वसामान्यांसाठी हटवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT