कुडाळ : कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनासंदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सोनवडे येथील नदीपात्र परिसरातील रॅम्पवर शनिवारी धडक दिली. या नदीपात्रात विनापरवाना वाळू उत्खनन करणार्या 2 होड्या त्यांनी पाण्यात बुडवल्या. तर सोनवडे व नेरूरपार येथे वाळू उत्खननासाठी तयार केलेले रॅम्पही उद्ध्वस्त केले. थेट जिल्हाधिकारीच अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात ऑनफिल्ड उतरल्याने वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील खाडीपात्रांमधून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन केले जात आहे. या अनधिकृत वाळूची मोठ्या प्रमाणावर दिवसाढवळ्या वाहतूक होत आहे. याची जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी गंभीरतेने दखल घेतली. शनिवारी त्यांनी प्रथम सोनवडे येथे धडक दिली. यावेळी वाळूने भरलेल्या दोन होड्या आढळल्या. मात्र त्याठिकाणी कामगार आढळले नाहीत. जिल्हाधिकार्यांनी वाळूने भरलेल्या या होड्या तत्काळ पाण्यात बुडवल्या. महसूल प्रशासनाच्या कारवाईची चाहुल लागताच वाळू उत्खनन करणारे ठेकेदार व कामगारांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यानंतर जिल्हाधिकार्यांनी नेरूरपार नदीपात्राचीही पाहणी केली. मात्र तेथे संशयास्पद काही आढळले नाही. यावेळी दोन्ही ठिकाणी काही वाळूचे रॅम्प आढळले. हे रॅम्प जिल्हाधिकार्यांनी तत्काळ उद्ध्वस्त केले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, तहसीलदार वीरसिंग वसावे, निवासी नायब तहसीलदार प्रतीक आढाव, मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. यापूर्वी अनेकदा अनधिकृत वाळू वाहतुकीवर पोलिस व महसूल प्रशासनाने कारवाई करत अनेक डंपर ताब्यात घेतले आहेत. मात्र आता जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी या विषयाच्या मुळाशी जाऊन वाळूच्या होड्या बुडवत संबंधित रॅम्पही उद्ध्वस्त केले आहेत.
अनधिकृत वाळू उत्खननसंदर्भात जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कडक भूमिका घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.