देवगड : शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह तेथील एका कर्मचारी व रूग्णाला मारहाण व शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी तसेच देवगड ग्रामीण रूग्णालयातील सुरक्षा रक्षकासह देवगड पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करून पोलिस व खासगी वाहनाचे नुकसान केल्याप्रकरणी राजा धर्मा गोरूड (33) रा.तुळशीनगर देवगड या संशयिताविरूध्द दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला .
१५ मे रोजी रात्री १० ते ११.३० वा.या वेळेत शिरगाव प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी रूचा भांडवले (२७) या रूग्ण तपासणी करीत असताना संशयित राजा गोरूड हा तेथे आला व त्यांने आरडाओरडा सुरू केला.तेथील रूग्ण संतोष आरेकर याच्याकडे त्याने पैशाची मागणी केली.यावेळी डॉक्टर भांडवले यांनी संशयितास शांत बसण्यास सांगीतले असता संशयितांने त्यांच्या अंगावर धावत जावून अश्लील शिवीगाळ करून तुम्हाला बघून घेईन अशी धमकी दिली.या घटनेत डॉ.भांडवले यांच्या मदती करीता सरसावलेले आरोग्य कर्मचारी साईल रामटेके यांच्यासह डॉ.भांडवले यांच्यावर संशयिताने दगडफेक केली.याप्रकरणी डॉ.रूचा भांडवले यांनी देवगड पोलिस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनूसार, संशयित राजा गोरूड याच्याविरूध्द शासकीय कर्तव्य बजावत असताना संशयिताने अंगावर धावत येवून अटकाव केल्याप्रकरणी देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास पोलिस उपनिरिक्षक संतोष भालेराव करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत १६ मे रोजी रात्री १ते पहाटे ४ वा.कालावधीत देवगड ग्रामीण रूग्णालय येथे संशयित राजा गोरूड याला पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करिता आणले असता देवगड पोलिस स्थानकाचे हवालदार गणपती गावडे तसेच त्यांच्या सोबत असलेले पो.कॉ.चालक विश्वास पाटील, पो.कॉ.रविंद्र महाले यांना शासकीय कर्तव्य करीत असताना राजा गोरूड याने मारहाण करण्यास सुरूवात केली.यात संशयिताने विश्वास पाटील यांना पाठीवर लाथा मारून दुखापत केली.रविंद्र महाले यांना हाताच्या थापटाने मारहाण केली व शिवीगाळ केली.तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना बघून घेतो अशी धमकी देत तेथील रूग्णालयाचे सुरक्षा रक्षक नाटेकर यांच्या अंगावर झाडाची कुंडी फेकून मारली.यानंतर संशयिताने पोलिस वाहनासह तेथे असलेल्या एका खाजगी वाहनाच्या काचा फोडल्या.या घटनेची फिर्याद पोलिस हवालदार गणपती गावडे यांनी दिली असून संशयित राजा गोरूड याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास स.पो.निरिक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.