Devgad Police Action Cannabis Plants Seized
देवगड: सिंधुदुर्ग पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत देवगड तालुक्यात मोठी कारवाई करत कोटकामते येथील आडीवरेवाडी परिसरातील एका घराच्या आवारात अवैधरित्या लावण्यात आलेली गांजाची २३ झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी संशयिताविरुद्ध एनडीपीएस (अंमली पदार्थ प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटकामते आडीवरेवाडी येथील रहिवासी ओंकार राजाराम कोतेकर (वय ३०) याने आपल्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम आणि उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम बुवा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने २९ मे रोजी छापा टाकला.
या कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, गणपती गावडे तसेच पोलिस कर्मचारी प्रसाद आचरेकर आणि रवींद्र महाले यांचा सहभाग होता. कारवाईदरम्यान दोन शासकीय पंच, कृषी अधिकारी, छायाचित्रकार, वजनकाटा धारक आणि फॉरेन्सिक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
पंचनाम्यानंतर संशयिताच्या घराच्या परिसरातून सुमारे ४९ हजार रुपये किमतीची, २ किलो ४५० ग्रॅम वजनाची, ३ ते ५ फूट उंचीची आणि उग्र वास असलेली २३ गांजाची झाडे जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली झाडे ताजी, ओलसर आणि गडद हिरव्या रंगाची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चौकशीदरम्यान संशयिताने आपल्या राहत्या घराच्या परिसरात गांजाची लागवड केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस हवालदार महेंद्र महाडिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार कोतेकर याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क) आणि २०(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.