कुडाळ : कसाल टोलनाका परिसरात गेले काही दिवस देवगड हापूसचे ब्रॅण्डिंग असलेल्या खोक्यांमध्ये कर्नाटकी आंब्यांची विक्री सुरु आहे. या बद्दल माहिती मिळताच गणेश गावकर व सहकारी यांनी कसाल टोलनाका गाठत कर्नाटकी आंबा विक्रीचा पर्दाफाश केला.
नुकताच १५ मे रोजी मुंबई येथे आंबा बागायतदारांचा वर्षावर भव्य मोर्चा निघाला होता . आंबा बागायतदार त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात अशी तीव्र परिस्थिती असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच कसाल टोलनाका परिसरात चार ते पाच स्टॉल्स कर्नाटकी आंब्याची विक्री करत आहेत. विक्री करणारे विक्रेते देखील स्थानिकच आहेत. महामार्गावरील कसाल टोलनाका येथे या आंब्याच्या खरेदीसाठी अनेक पर्यटक थांबत असून देवगड हापूस च्या नावाखाली कर्नाटकी आंबे विकत घेत आहेत. पर्यटन हंगामामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असून अशा बनावट विक्रीमुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे.
या सर्व प्रकाराची माहिती मिळताच देवगड युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर व त्यांचे सहकारी टोलनाका येथे पोहचले. व तेथील स्टॉल्सवर विक्री करता ठेवण्यात आलेल्या आंब्याच्या बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये कन्नड भाषेची रद्दी वापरलेली असून हा कर्नाटकी आंबा आहे याची खात्री पटली. तसेच इतर स्टॉल वरील सर्व विक्रेत्यांनी विक्री करता ठेवण्यात आलेले आंबे पॅक बंद करून टेम्पो मध्ये भरत काढता पाय घेतला.
गणेश गावकर, सहकारी यांनी घटना स्थळी आंब्यांच्या खरेदी करता आलेल्या पर्यटकांना देखील या बनावट विक्रीची माहिती देत फसवणूक होण्यापासून सतर्क केले. तसेच प्रशासनाने देवगड हापूस च्या नावाखाली कर्नाटक आंब्याची बनावट विक्री करणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.